आपला राजीनामा ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला असल्याची माहिती लंके यांनी सुपे (ता. पारनेर) येथे आयोजित मेळाव्यात दिली. आता लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत त्यांची लढत होणार आहे.
लंके म्हणाले, या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावूक झाले होते. शरद पवार यांच्याबद्दल लंके म्हणाले, मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितले लोकसभा लढवावी लागेल. त्यावर मी लगेच हो म्हणालो. आता शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार आहे, असेही लंके यांनी जाहीर केले.
गेल्या अनेक दिवसांपासून लंके यांची भूमिका ठरत नव्हती. पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढविण्यामध्ये त्यांच्या आमदारकीची अडचण होती. शिवाय राजीनामा दिला तर लगेच पोटनिवडणूक जाहीर होण्याचीही शक्यता होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अकोला विधानसभा पोटनिवडणूक हायकोर्टाने रद्द केल्याने पारनेरची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता मावळली. त्यामुळे पुन्हा वेगाने हालचाली झाल्या. अखेर लंके यांनी तो निर्णय घेतला, सुपे येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
राष्ट्रवादीच्या पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यावेळी उपस्थित होते. मेळाव्यात लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. लंके म्हणाले, विखे पाटील पिता-पुत्रांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले. त्यांचे पीए स्वत:चे पीए ठेवतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे खासदार आणि राज्यातील मंत्रिपद असूनही त्यांनी विकास कामे केले नाहीत. एवढ्या काळात एकही वैद्यकीय महाविद्यालय यांनी नगरला आणले नाही. कारण त्यांचे खासगी महाविद्यालय आणि रुग्णालय चांगले चालावे यासाठी ते सरकारी संस्था येऊन देत नाहीत.