जळगावात ठाकरे गट आयात उमेदवार देणार?
जळगाव लोकसभेची जागा असलेल्या ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपातील एका प्रमुख पदाधिकाऱ्याला फोडण्याचा डाव असल्याने उमेदवार ऐनवेळी जाहीर भाजपाची नाकेबंदी करण्याचा डाव खेळला जात आहे. दरम्यान, भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाची देखील ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील इच्छुक डॉ. हर्षल माने, कूलभूषण पाटील व अॅड. ललिता पाटील यांची नावे मागे पडली आहेत.
रावेरात पवार गटातून दररोज वेगळे नाव
शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार निश्चितीसाठी काल बुधवारी मुंबईला झालेल्या पक्षाच्या बैठकीत चार नावांवर चर्चा झाली. मात्र, उमेदवाराचे नाव अंतीम होऊ शकलेले नाही. ५ एप्रिल रोजी पक्षाकडून उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, संतोष चौधरी यांनी उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर अॅड. रविंद्र पाटलांचे नाव समोर आले. त्यापाठोपाठ आता महिनाभरापुर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव समोर आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.
धुळ्यातही उमेदवारीचा पेच कायम
भाजपाचे उमेदवार डॉ. भामरे यांच्या विरोधात तुल्यबळ असलेल्या उमेदवाराचा शोध काँग्रेकडून घेतला जात आहे. आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारीसाठी नकार दिल्याने आता काँग्रेसकडून तुषार शेवाळे, प्रशांत हिरे, धुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. त्यात आणखी काही नविन नावांची भर पडत असल्याने तेथेही आघाडीचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत.