नाशिक जिल्ह्यात सुमारे बारा हजार उद्योग असून, त्यातील २५ टक्के उद्योगांना उत्पादनासाठी निरनिराळ्या धातूंची गरज असते. ऑटोमोबाइल, विविध यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे व अन्य कारखान्यांमध्ये कच्चा माल म्हणून स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, जस्त, लोखंड आदी धातूंची गरज भासते. जिल्ह्यात असे सुमारे तीन हजार उद्योग आहेत. त्यांना लागणारा धातूचा कच्चा माल कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली व गुजरातच्या काही भागांतून येतो. या उद्योगासाठी आवश्यक असणारी वाळू, कच्चा माल व अन्य सुविधा तेथे मुबलक प्रमाणात आहेत. परिणामी, त्या भागात कास्टिंग व फोर्जिंग उद्योगांची संख्या मोठी आहे.
नाशिकला तेथून कच्चा माल मागवावा लागतो. त्यासाठी प्रतिकिलो तीन रुपये वाहतूक खर्च लागतो. हा खर्च वाचावा व या उद्योगाला जिल्ह्यातही वाव मिळावा, यासाठी उद्योजकांच्या संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आयमा’च्या वतीने याबाबत चर्चासत्र घेण्यात आले. आता जिल्ह्यात कास्टिंग व फोर्जिंग उद्योगांसाठी क्लस्टर तयार करावे, असा प्रस्ताव ‘निमा’च्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राला सादर केला जाणार आहे. त्याच्या ‘डीपीआर’वर सध्या काम सुरू आहे. हे क्लस्टर निर्माण झाल्यास त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व तंत्रज्ञान उपलब्ध होईल. जिल्हा उद्योग केंद्राकडून साकारण्यात आलेल्या पैठणी क्लस्टरच्या धर्तीवर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
तंत्रज्ञानात मोठे बदल
धातूंचे विविध आकार तयार करणाऱ्या कारखान्यांना ‘फाउंड्री’ म्हणतात. धातू वितळवून ते आवश्यकतेनुसार मोल्ड केले जातात. या उद्योगाशी संबंधित काही कंपन्या पूर्वी नाशिकमध्ये होत्या. पण वेळीच अद्ययावतीकरण न झाल्याने त्या बंद पडल्या. आता नाशिकमध्ये मोजक्या कंपन्या आहेत. गेल्या काही वर्षांत या उद्योगाच्या तंत्रज्ञानात प्रचंड बदल झाला असून, त्यामुळे तो सुलभ झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
लोक पोलंड, जर्मनीतून येऊन पुण्यात प्रकल्प सुरू करीत आहेत. ते सगळे पर्यावरणपूरक आहेत. नाशिकमध्ये या उद्योगाला मोठा वाव असून, क्लस्टर झाल्यास येथे प्रमुख उद्योगांची साखळी विकसित होईल. त्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. – निखिल पांचाळ, सरचिटणीस, निमा