• Sat. Sep 21st, 2024

घड्याळ नको! धाराशिवमध्ये ‘सातारा पॅटर्न’; परदेशींमुळे नवा तिढा, पुन्हा अडचणीत अजितदादा

घड्याळ नको! धाराशिवमध्ये ‘सातारा पॅटर्न’; परदेशींमुळे नवा तिढा, पुन्हा अडचणीत अजितदादा

धाराशिव: सातारच्या जागेनंतर आता धाराशिवच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. धाराशिवमध्ये साताऱ्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारानं राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे साताऱ्यापाठोपाठ धाराशिवमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

महायुतीत राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामती, शिरुर, रायगड, नाशिक, धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी लढण्यास इच्छुक आहे. भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे. पण जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असल्यानं त्यांची गोची झाली आहे.
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
राष्ट्रवादीनं प्रवीण परदेशी यांना घड्याळावर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण परदेशी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास तयार नाहीत. त्यांना भाजपकडूनच निवडणूक लढवायची असल्यानं धाराशिवमध्ये तिढा निर्माण झाला आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. त्यात लोकसभेच्या उमेदवारांची यादी निश्चित केली जाईल. या बैठकीत उस्मानाबादबद्दल काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

काटेवाडीकरांना भलं-बुरं कळतं, लोकसभा लढवेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं

धाराशिवमध्ये सातारा पॅटर्न, अजितदादांची अडचण
धाराशिवसारखीच परिस्थिती काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात पाहायला मिळाली. सातारची जागा राष्ट्रवादीला सुटली असल्यानं भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची गोची झाली. त्यांनी दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शहांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ते साताऱ्यात परतले.
नारायण राणे लोकसभेच्या आखाड्यात; ठाकरेंच्या शिलेदाराचं आव्हान; लेकाच्या पराभवाचा बदला घेणार?
उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीनं साताऱ्यातून घड्याळ चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. पण राष्ट्रवादीची ऑफर भोसलेंनी धुडकावली. त्यांनी थेट दिल्ली गाठून वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. साताऱ्यातून निवडणूक लढवायची आहे आणि लढेन तर भाजपच्या चिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यानंतर सातारची जागा भाजपला सोडण्यात आली. त्याबदल्यात नाशिकची जागा मागण्यात आली. नाशकात शिवसेनेचा खासदार असल्यानं शिंदेसेनेत नाराजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed