‘शिवरत्न’वर वेगवान घडामोडी
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतःहून भेट घेत समर्थकांच्या तीव्र भावनांची कल्पना दिली. भाजपाने उमदेवारीबाबत ठाम राहण्याची भूमिका घेतली. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यात दररोज राजकीय घडामोडी घडत आहेत. बुधवारी सकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी आले होते. विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी प्रशांत परिचारक यांची बंद दाराआड चर्चा झाली. प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावरून जाताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शिवरत्न बंगल्यावर आले.
खासदार अमोल कोल्हेंची मोहितेंशी चर्चा, तुतारी वाजणार?
शरद पवार गट राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे बुधवारी सकाळी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यात दाखल होताच अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महादेव जानकर यांनी अचानकपणे शरद पवारांच्या तुतारीला सोडून महायुतीत जाण्याच्या निर्णय घेतल्याने शरद पवारांची कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. परंतु आता नाराज मोहिते पाटील यांना मविआमध्ये घेऊन पवार महायुतीला धक्का देतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
बारामती मतदारसंघातील राजकीय गणितांची जुळवाजुळव करताना रासपचे महादेव जानकर यांना सोबत घेऊन शरद पवार हे महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत होते. परंतु महायुतीने डाव पलटवून लावत जानकरांना गळाला लावलं. त्यानंतर पवारांनी मोहिते पाटलांना निंबाळकरांविरोधात तुतारी हातात घ्या, असे सांगितले. त्यानंतर बुधवारी डॉ अमोल कोल्हे हे शिवरत्न बंगल्यावर पवारांचा सांगावा घेऊन आल्याने मोहिते पाटील तुतारी हातात घेऊन माढा लोकसभा मतदार संघात उतरतील असे बोलले जात आहे.