• Mon. Nov 25th, 2024

    रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण

    रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण

    Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेल्या आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसला ठणकावले आहे.

    काँग्रेसने महाराष्ट्रासाठी दोन याद्या जाहीर केल्या, त्यात रामटेकसुद्धा आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. त्या जागेला मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान जर झाला तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस इतर ठिकाणी जागा कुठे मागतो आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून आम्ही फक्त राज्यात जागा मागतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ तिथे काँग्रेससमोर कुणीच नाही. तिथे जागा मागण्याचा आमचा प्रश्न नाही, त्या ठिकाणी आम्ही जागा मागतोय का? महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे, अशा कडक शब्दांत राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलच फटकारले आहे.

    ठाकरेंच्या शिवसेनेने आज १७ जागांवरील उमेदवार जाहीर केले, त्यानंतर बोलताना संजय राऊत यांनी रोखठोक सांगितले की, जागावाटपावर गेल्या दोन अडीच महिन्यापासून चर्चा करतोय. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही काही मतदारसंघ आहे. फक्त आम्हाला अस्तित्व हवं म्हणून कुठे जागा मागावी हे आघाडीत योग्य नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. राज्यात काँग्रेस केवळ एका जागेवर निवडून आली होती. एक जागा मिळालेली काँग्रेस १६ जागांवर लढत आहे. त्या पैकी १० जागांवर जिंकणार अशी परिस्थिती आहे,या परिस्थितीत काँग्रेस शरण गेली असे कसे म्हणू शकतो? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. रामटेकची जागा जिथे २५ वर्ष शिवसेना जिंकते. मग तिथे आम्ही शरण गेलो असं म्हणू का? असा उलट सवाल राऊतांनी केला.

    आमचं जागावाटप महाराष्ट्रात होतं, दिल्लीला जावं लागत नाही; राऊतांचा टोला


    आघाडीला एकत्र काम करायचे असल्यावर जोर देत राऊत म्हणाले, कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे. ३० वर्ष आम्ही तिथे लढतोय आणि जिंकतोय. आता तिथे शाहू महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी असे ठरले होते महाराज ज्या पक्षाचे चिन्ह घेतील त्यांना ती जागा सोडण्यात येईल. मग आम्ही मविआमध्ये काँग्रेसला ती जागा सोडली. मग आम्ही जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करायची का? हातकणंगले जागेवर राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. ती हक्काची जागादेखील आमची जात आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एक जागा आम्ही घेत असू तर महाविकास आघाडीने त्याचा स्वीकार केला पाहिजे. दिल्लीतील वरिष्ठ नेते समजून घेतील. ही यादी अंतीम आहे, त्यामुळे सांगलीतील उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न नाही असे ठासून राऊतांनी सांगितले.

    सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य, ठाकरेंच्या मेळाव्यात कॉंग्रेस सहभागी होणार नाही

    आंबेडकरांच्या भूमिकेवरही राऊतांची टीका

    दरम्यान, प्रत्येक पक्षात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. आता काँग्रेसला वाटत असेल ४८ जागांवर लढू तर त्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आमच्याही कार्यकर्त्यांच्या ४८ जागा लढविण्याची तयारी आहे. परंतु आघाडी केल्यावर काही जागा सोडाव्या लागतात, काही जागा मिळतात. हा आशा-निराशेचा खेळ असतो. आम्ही वंचितला जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू राहिली असती तर ६ जागाही दिल्या असत्या. आमचे मन साफ होतो. राजकीय व्यवहार पारदर्शक होता. वंचित, शोषित जनता या लढाईत आमच्यासोबत राहावी ही आमची भूमिका होती. शेवटी डॉ. आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे. त्यामुळे जर अप्रत्यक्ष कुणी भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेत असेल तर राज्यातील जनता त्यांना स्थान देणार नाही असेही राऊतांनी वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयावर म्हटलं.

    ज्यांनी धनुष्यबाण हिरावून घेतला त्यांना निवडणुकीत जागा दाखवून देऊ | संजय जाधव

    राज्यात आम्हीच मोठे भाऊ

    आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा जो जिंकणार त्याची ती जागा असे सूत्र ठरविण्यात आले. आकडे वाढवण्यासाठी कोणताही पक्ष जागा लढवत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातले आणि देशातील नेते आहेत. परंतु त्यांनी फक्त १० जागा मागितल्या. काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रात त्यांची ताकद ज्या जागांवर आहे त्या ठिकाणी त्यांना जागेसाठी आग्रह धरला पाहिजे. शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जे राजकारण घडलं, त्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे. त्याचा फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ, देशात काँग्रेसचा पंतप्रधान बसवायचा हे आमचं धोरण आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *