पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत गरजू कुटुंबाला गोवऱ्या आणि लाकडे फुकट दिल्याच्या रागात स्मशान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरजू कुटुंबाला अंत्यविधीसाठी मोफत गोवऱ्या आणि लाकडे दिल्याच्या कारणावरून स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या घटनाची परिसरात चर्चा होत आहे. केवळ गोवऱ्या आणि लाकडे फुकट दिले म्हणून जीवघेणा हल्ला कसा केला जावू शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे.
याबाबत सचिन उत्तम रणपिसे (वय ३५, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय अशोक माकर (वय २५), अतिश मारुती चव्हाण (वय २७) आणि रामू नर्सराज मुप्पाला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणपिसे हे औंध येथील स्मशानभूमीत ऑपरेटर म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्राच्या नातेवाइकाचे निधन झाले होते. संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि लाकडे रणपिसे यांनी मोफत दिली होती. दरम्यान, सुतारवाडी स्मशानभूमीत गोवऱ्या आणि लाकडे पुरवण्याचे टेंडर अजय माकर याच्याकडे आहे.
ही घटना ११ मार्च रोजी रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास पाषाण येथील शिवशक्ती चौकाजवळ घडली. अजय माकर याने सचिन रणपिसे यांना विठ्ठल मंदिराजवळ बोलावून “तू लाकडे आणि गोवऱ्या फुकट का दिलीस?” असा जाब विचारत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी रणपिसे यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर माकरने सत्तूरने त्यांच्या दोन्ही खांद्यांवर वार केले, तर तिसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.
जखमी रणपिसे यांनी कसाबसा जीव वाचवत तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप करत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा