मात्र या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली असून आज पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिक लोकसभेची जागा ही धनुष्यबाण चिन्हावर लढवली जावी, शिवसेनेचा उमेदवार हे हेमंत गोडसे असावे, अशी मागणी शिवसैनिक करत आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असल्यामुळे नाशिकमधील शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आज पुन्हा शिंदेंचे शिवसैनिक हे मुंबईचे दिशेने रवाना झाले आहे. शेकडो शिवसैनिकांनी पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिक साकडे देखील घालणार आहे. नाशिकहून गोडसे समर्थक आणि शिवसैनिक हे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी या शिवसैनिकांच्या गाड्यांवर खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर “आता थांबायचं नाही,लढायचं” अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शिंदेंच्या भेटीत शिवसैनिकांना नेमका पुन्हा काय आश्वासनं मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध दर्शवला होता. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी हेमंत गोडसे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले असल्यामुळे हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडून येऊ शकत नाही, अशी शक्यताच शिवसेनेच्या मित्र पक्षांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे भाजपने हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर भाजप हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार नाही. हेमंत गोडसे हे मोदींच्या नावावर दोन टर्म निवडून आले. मात्र मोदींचा फोटो आणि नाव गोडसे वापरणार नसेल तर भाजप हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा मदत करणार नाही, अशी भूमिका यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सागर बंगल्यावर भेट घेतली होती.
मात्र आता भाजप आणि शिंदे यांचे शिवसेनेतील वादावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिक लोकसभेची जागाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडत मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याने नाशिक शिंदेंची शिवसेना ही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध त्यामुळे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेत निवडून येणार नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या हक्काची असून विजय उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांना महायुतीने उमेदवारी जाहीर करावी आणि नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच राहावी, अशी भूमिका घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिंदे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
मात्र आज पुणे येथे अजितदारांच्या राष्ट्रवादीची बैठक देखील संपण्यासाठी यावेळी ही जागा कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार राष्ट्रवादीने लढावी अशी देखील भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीतील रस्सीखेच सुरू असून उमेदवारीचा वाद आता थांबायचं नाव घेत नसल्यास देखील पाहायला मिळत आहे. महायुतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार? आणि कोण नाशिक लोकसभेत महायुतीचा उमेदवार असणार? हे आता बघणं देखील तितकच महत्त्वाचं असणार आहे.