नाशिक: महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. यात सतरा उमेदवारांचा समावेश आहे. यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वाजे हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मोठे नेतृत्त्व आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी ग्रामीण भागातील मतदारसंघातील चर्चेतील नाव आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांनी वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोलले जात आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले. मात्र शिंदे यांच्या बंडात गोडसे यांनी शिंदेंना साथ दिली. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी सक्षम उमेदवार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संघटक, माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असे बोलले जात होते. मात्र करंजकर हे सक्षम उमेदवार नसल्याने सलग तिसऱ्यांदा विजय करंजकर यांना ठाकरे यांच्याकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
सध्याची राजकीय समीकरणे बघता वाजे महायुतीच्या उमेदवाराला सरस ठरू शकतात. राजाभाऊ वाजे हे नाशिकमधील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे वाजे हे नाशिकमधील चर्चेतील नेतृत्व असल्याने पक्षाने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजाभाऊ वाजे नेमके कोण?
राजाभाऊ वाजे हे ठाकरेंचे विश्वासू नेते आहेत. सिन्नर येथील शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांच्या नोकऱ्या यासाठी आक्रमक भूमिका घेणारे वाजे जिल्हाभर चर्चेतील नाव आहे. मागील निवडणुकीची रणनीती बघता सिन्नर तालुक्यातून वाजे यांना मोठी ताकद मिळू शकते. नाशिक शहर वगळता देवळाली कॅम्प, सिन्नर,नाशिक पूर्व, इगतपुरी- त्रंबकेश्र्वर या विधानसभा मतदारसंघातून वाजे यांना मोठी आघाडी मिळू शकते. ठाकरे यांनी पुन्हा वाजे यांच्या रूपाने सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी दिल्याने ठाकरे यांच्या सेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी ही परंपरागत लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजाभाऊ वाजे हे मराठा असल्याने भुजबळ यांना टक्कर देण्यासाठी वाजे यांच्या रूपाने महाविकास आघाडीकडून मराठा कार्ड वापरण्यात आले आहे.