• Sat. Sep 21st, 2024
नाशिकची जागा भाजपला का हवी आहे, भाजपची छुपी खेळी यशस्वी होणार? राजकीय समीकरणं काय?

शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदेंची शिवसेना तिसऱ्यांदा लोकसभेत उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सलग दुसऱ्यांदा शिंदेंचा खासदार नाशिक लोकसभेत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला. त्यामुळे तिसऱ्यांदा देखील महायुतीचा उमेदवार हा नाशिक लोकसभेत निवडून येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. मात्र, ही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभेची जागा ही भाजपला आपल्या वाटेला का हवी आहे? नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपकडे कोणते चेहरे आहेत? अशी देखील चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे.नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीत शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. शिंदे यांचे खासदार हेमंत गोडसे हे सलग दहा वर्ष नाशिक लोकसभेतून निवडून येत आहेत. मात्र, गोडसेंना भाजपने कडाडून विरोध दर्शवला असला तरी मात्र महायुतीतील प्रमुख नेत्यांनी ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडली जाईल अशी भूमिका घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे. सोमवारी (२५ मार्च) भाजपचे तीन आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेतली. भाजपची ताकद नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपने कमळावर उमेदवार द्यावा, अशी भूमिका आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे.
लाचारी मान्य करणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा; वंचित-मविआत बिनसलं?

नाशिक लोकसभेत भाजपचे संभाव्य उमेदवार

माजी नगरसेवक दिनकर पाटील हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. दिनकर पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग देखील लावली आहे. मात्र, दिनकर पाटील यांचे नाव भाजपकडून समोर येत असलं तरी देखील दिनकर पाटील यांना उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यास मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरे नाव आहे महाराष्ट्र राज्याचे भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण. अजित चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते आहे. नाशिक शहरात युवकांची मोठी फळी चव्हाण यांच्या मागे पाहायला मिळते. अजित चव्हाण यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध असल्याने नाशिक लोकसभेत अजित चव्हाण हे भाजपच्या धक्का तंत्राचे संभाव्य उमेदवार असू शकतात. तर दुसरीकडे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे देखील उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राहुल ढिकले यांचे भाजपसह मनसेतही स्थानिक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध पाहायला मिळतात. त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवारांपैकी राहुल ढिकले यांचं नाव देखील चर्चेत आहे.

नाशिक लोकसभेत जातीय राजकारण

नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून भाजपला सुटल्यास दिनकर पाटील, अजित चव्हाण, राहुल ढिकले हे तीनही संभाव्य उमेदवार मराठा असल्याने नाशिक लोकसभेत मागील निवडणुकीचा निकाल बघता भाजप मराठा कार्ड बाहेर काढून ही जागा पुन्हा निवडून आणण्यास यशस्वी ठरू शकते. नाशिक लोकसभेत मराठा उमेदवार हा भाजपने दिल्यास नाशिकमधील मराठा मतदारांचा टक्का सर्वाधिक असल्याने भाजपला त्याचा फायदा मिळू शकतो. दिनकर पाटील हे सातपूर, त्र्यंबकेश्वर या भागात आपला दांडगा जनसंपर्क असल्याने दोन मतदारसंघात सर्वाधिक मतं घेऊ शकतात.

तर, अजित चव्हाण हे नाशिक शहरासह नाशिक ग्रामीण भागात युवकांचा चेहरा म्हणून आणि अभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांना पसंती मिळू शकते. आमदार राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्व मतदार संघातून पहिल्यांदाच आमदारकी लढवत आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली असल्याकारणाने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात आणि नातेसंबंधातून भाजपला ही जागा मिळवून देण्यास यशस्वी ठरू शकता.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दारात हेमंत गोडसेंचं शक्तिप्रदर्शन; नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादंग

दरम्यान, भाजप नाशिकमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या जोरावर नाशिक लोकसभेची जागा जिंकू शकतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघाची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी, यामागील कारण भाजपकडे संभाव्य तीन इच्छुक उमेदवार असल्यामुळे आणि मतदारसंघातील भाजपची ताकद सर्वाधिक असल्याने कमळावर उमेदवार निवडून देण्यासाठी नाशिक भाजप प्रयत्न करत आहे.

मात्र, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कडाडून विरोध करत भाजप नाशिक लोकसभेची जागा आपल्या पारड्यात खेचण्यासाठी किती यशस्वी ठरत? हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र, भाजपची ही छुपी खेळी शिंदेंच्या सेनेला शह देण्यास यशस्वी ठरते का? आणि शिंदे यांची सेना भाजपची ताकद सर्वाधिक असतानाही धनुष्यबाणावर उमेदवारी घेत खासदारकीची हॅट्रिक मारते का? हे बघणे देखील आता बघण्यात तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed