• Sat. Sep 21st, 2024
धुलिवंदनाच्या दिवशी अनर्थ, पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघांचा अंत; विदर्भात तिघांचा बुडून मृत्यू

म.टा.प्रतिनिधी, भंडारा : भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात धूलिवंदन साजरे करून नदीवर आंघोळीसाठी गेलेले तीन युवक बुडाले. वैनगंगा आणि पैनगंगा नदीमध्ये या घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडल्या.होळीनिमित्त रंग खेळून झाल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या नितेश तेजराम बरडे (२५) रा. कुडेगाव (लाखांदूर) याचा मृत्यू झाला. नितेश हा लहान भाऊ आणि गावातील काही युवकांसोबत नदीवर गेला होता. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबत असलेल्या इतर युवकांनी मदतीसाठी धावा केला. हे पाहताच नावाडी धावून आला. त्याने नितेशला बाहेर काढले. तातडीने लाखांदूर येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, सुभाष शहारे, जितेंद्र खरकाटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
निवडणुकीचा खर्च काढला, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं, अजितदादा अमोल कोल्हेंवर तुटून पडले

देव्हाडा येथील वैनगंगा नदीत अमित पुरुषोत्तम नागदेवे (३१) मुंडीकोटा (तिरोडा) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. अमित हा मित्रांसोबत देव्हाडा बु. येथील वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी करडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

पैनगंगेतील खोल पाण्याने घेतला जीव

रंग खेळून झाल्यानंतर आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबनजवळ घडली. प्रदीप गजानन बाजनलावार (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रदीप हा मित्रांसोबत पैनगंगा नदीवर गेला. नदीत पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागला. काठावर असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. गावात माहिती समजताच सारेच धावून आले. काही वेळातच मुकुटबन पोलिस घटनास्थळी आले. तीन तासांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनाजवळ प्रवीणचा मृतदेह नदीच्या काठावर आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed