• Sat. Sep 21st, 2024
शिवतारेंची ताकद, सहकाऱ्यांचा छुपा पाठिंबा, विजय शिवतारे अजितदादांना घाम फोडणार?

दीपक पडकर, बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील गणिते रोज बदलत आहेत. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असून त्यात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के झाले असताना आता पुरंदरच्या विजय शिवतारे यांनी त्यात खोडा घातला आहे. इंदापूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेळावा घेत असून ते शिवतारेंनाही कानमंत्र देतात का? याकडे आता लक्ष लागले आहे.

मविआकडून सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीकडून सुनेत्रा पवार अशीच थेट लढत होणार होती. परंतु शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा लढवणार आणि पवारांना पर्याय देणार असे नुकतेच घोषित केले आहे. या मतदारसंघात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के होते. इंदापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पवारांविषयी नाराजी आहे, परंतु त्यांची नाराजी फडणवीस यांनी दूर केली आहे. किंबहुना उरली सुरली नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे इंदापुरात येऊन सभा घेणार आहेत. फडणवीसांच्या दौऱ्यानंतर हर्षवर्धन पाटील-अजित पवार पॅचअप होईल असे सांगितले जात आहे. परंतु गेली २५ वर्षे हर्षवर्धन यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या अजित पवार यांच्या उमेदवाराला हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते साथ देतील का? हा खरा प्रश्न आहे.
एकीकडे घरातल्या लोकांशी लढाई, दुसरीकडे शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील, अजितदादा चक्रव्यूह कसा भेदणार?

विजय शिवतारे यांचे बंड अजित पवार यांच्यासाठीच येथे अडचणीचे ठरू शकते. कारण शिवतारे हे शिवसेनेचे नेते आहेत. पुरंदरमध्ये शिवतारे यांची मोठी ताकद आहे. यापूर्वी भाजप-सेना युतीमध्ये भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांचे उत्तम संबंध राहिले आहेत. ते निवडणुकीत उतरले तर शिवसेनेसह भाजपचे काही लोक त्यांना मदत करतील असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवतारे निवडणुकीत उभे राहतील का? राज्यातील वरिष्ठ त्यांना थोपवतील का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
तुम्ही CM झाले असते, संग्राम मंत्री झाले असते, पण…. थोपटेंपुढे शिवतारेंनी पवारांच्या अन्यायाचा पाढा वाचला

दौंडमध्ये आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात हे दोघेही यंदा सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसून येतील. त्यामुळे दौंडबाबत सुप्रिया सुळे यांच्यासाठी चिंतेचे वातावरण आहे. सुळे यांच्याकडे तेथे सक्षम व खंबीर नेतृत्व नाही. त्यामुळे दौंड तालुक्यात त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

शिवतारे बारामतीतून लढणार, अजित पवार पत्रकाराला म्हणाले, तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हीही लढा !

भोरचे आमदार संग्राम थोपटे हे सुळेंसोबत असल्याने येथे अजित पवार यांच्यावर परिश्रमाची वेळ आली आहे. खडकवासला हा शहरी भाग भाजपच्या विचारांचा आहे. तेथे सुळे कसे नियोजन करतात, हा औत्सुक्याचा भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed