• Sat. Sep 21st, 2024

राजकारण: काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा मिळविणार? प्रतिष्ठा पणाला, पाडवी की गावित, कोण बाजी मारणार?

राजकारण: काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा मिळविणार? प्रतिष्ठा पणाला, पाडवी की गावित, कोण बाजी मारणार?

पंकज काकुळीद, नंदुरबार: लोकसभा आणि विधानसभेत जेव्हा भाजपचे आमदार-खासदार निवडून येतील तेव्हाच दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत येईल, असे भाकीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी वर्तविले होते. त्याचाच प्रत्यय सन २०१४ मध्ये आला. पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे तब्बल नऊ वेळेस प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री स्व. माणिकराव गावित यांचा डॉ. हिना गावित यांनी पराभव केला आणि केंद्रात भाजप सत्तेत आला, तर सन २०१४ मध्येच नंदुरबार विधानसभेत भाजपचा उमेदवार विजयी झाला आणि राज्यातही कमळ फुलले.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली. मात्र, डॉ. हीना गावीत यांनी त्यांचा ९५ हजार मतांनी पराभव करीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. यंदा मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील बंडाळी निकाल बदलवू शकते. डॉ. हीना यांना शिंदे गटाकडून विरोध होत असताना भाजपने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दाखविला खरा; परंतु, भाजपमधील नाराज, शिंदे गटातील आमदार आणि कार्यकर्ते हा विश्वास कितपत सार्थ ठरवतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसने के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ते नवखे असले तरी त्यांच्या माध्यमातून बालेकिल्ल्याची ओळख परत मिळविण्यासाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पाडवी व गावित या दोन दिग्गज घराण्यांपैकी ही लढत कोण जिंकणार, याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा व विधानसभेसाठीही हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. देशातील पहिला आधारकार्डधारकही येथील आहे. स्थानिक नेत्यांचे विविध पक्षांतील प्रवेश, शिंदे गटाचा विरोध, ‘डिस्ट्रिक्ट फोरम’ची स्थापना, भाजपतील गटबाजी आदी मुद्दे महत्त्वाचे ठरतील.

गांधी घराण्याचा भरवसा

जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या येथे सभा झालेल्या आहेत. सोनिया गांधी यांची पहिली सभाही जिल्ह्यातच झालेली असल्याने खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येथे आली होती. मात्र, काँग्रेसला त्याचा लाभ उचलता आला नाही. राहुल येथे आले असताना माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वळवी हे आदिवासी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात.

दुसरीकडे, अक्कलकुवा तालुक्यातील ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनीही नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे ते कट्टर विरोधक आहेत. काँग्रेसचा प्रचार करावा लागू नये आणि जिल्ह्यात खुंटलेला विकास पुन्हा करण्याचा दावा त्यांनी केला. शिरपूर तालुक्यातील अमरिश पटेल हे २०१९ च्या निवडणुकीत हीना गावित यांच्याविरोधात होते. मात्र, आता ते भाजपमध्ये आहेत. विविध नेत्यांनी भाजप व शिंदे गटात केलेला प्रवेश डॉ. गावित यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा विरोध

शिंदे गटाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गावित परिवाराचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांनी नुकतीच काँग्रेसचे के. सी. पाडवी यांची भेट घेतली. तसेच, काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. रघुवंशी यांनी हीना गावित यांच्या उमेदवारीला विरोध करीत गावित परिवाराविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून ‘डिस्ट्रिक्ट फोरम’ची स्थापना केली. विशेष म्हणजे, त्यात भाजप आमदारही सहभागी झाले होते. मात्र, दरम्यानच्या काळात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काही नेत्यांशी जुळवून घेतले.

कोण आहेत इच्छुक?

काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी शिरीषकुमार नाईक, पद्माकर वळवी यांची मुलगी सीमा वळवी आदी इच्छुक होते. के. सी. पाडवी यांनी उमेदवारीबाबत नकार कळविल्यानेच मुलाचे नाव पुढे आले आणि काँग्रेसश्रेष्ठींनी पसंतीची मोहोर उमटवली. संघ परिवाराचे जुने कार्यकर्ते डॉ. सुहास नटावदकर यांची मुलगी डॉ. समिधा या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, हीना यांच्या नावाच्या घोषणेनंतर त्या अपक्ष उमेदवारी करतात की, कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नंदुरबार, तळोदा-शहादा, अक्राणी व नवापूर यासह धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या दोन विधानसभा मतदारसंघाचा काही भाग या मतदारसंघात जोडला गेला आहे. नंदुरबार, तळोदा-शहादा, शिरपूर मतदारसंघ भाजपकडे, अक्राणी व नवापूर काँग्रेसकडे, तर साक्री येथे अपक्ष आमदार आहे. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे.

विरोधक गावितांच्या तंबूत, पण…

आदिवासीबहुल लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ तापी आणि नर्मदा या दोन नद्यांनी वेढलेला आहे. त्यांची संस्कृती, पावरा नृत्य प्रसिद्ध आहे. यासोबतच कोंकणी, भिल्ल, मावची, वसावे, पावरे आदिवासी या जातीसुद्धा परिसरात आहेत. डॉ. हीना गावित यांच्याबद्दल मतदारांत काही प्रमाणात नाराजी असून, त्यांच्या संपर्काबद्दलही तक्रारी आहेत. गेल्यावेळी युती असल्याने शिवसेना आणि भाजप सोबत होते. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती असे गट पडल्याने डॉ. हीना यांचे विरोधकही त्यांच्यासोबत आले खरे; परंतु, प्रचारात ते सक्रिय होतात का, आणि झाले तरी मनापासून काम करतील काय, हे कोडेच आहे.

राहुल गांधींसोबत मणिपूर ते नंदुरबार अनवाणी चालणारा समर्थक

प्रचाराचे मुद्दे

– आदिवासींसाठी आरोग्य सुविधांचा अभाव

– रुग्णालये, आरोग्य केंद्रे, ट्रॉमा केअर सेंटर नाही

– नवीन उद्योगधंदे, कारखान्यांचा अभाव

– त्यामुळे तरुणांची वाढती बेरोजगारी

– स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन जमिनींचा वाद

– जागांचे उतारे, नोंदींचा गोंधळ

सन २०१९ निकाल

विजयी उमेदवार- डॉ. हीना गावित (भाजप)- ६,३९,१३६

पराभूत उमेदवार- अॅड. के. सी. पाडवी (काँग्रेस)- ५,४३,५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed