सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदेंनी आडम मास्तरांचा दोनदा पराभव केला
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कामगार वर्ग, पद्मशाली समाज, मोची समाज, मुस्लीम समाज, विडी कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या भरवशावर माकप नेते आडम मास्तर दरवेळी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. २०१४ आणि २०१९ अशा दोन वेळी प्रणिती शिंदे यांनी आडम मास्तर यांचा दारुण पराभव केला होता. दोन्ही वेळी कामगार नेते नरसय्या आडम यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते.
प्रणितींसमोर नवा पेच
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. प्रणिती शिंदे यांनी याच मतदारसंघातून तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी वयाचं कारण देत राजकारणातून स्वेच्छा निवृत्त घेतली असून कन्या व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर माकपने नवा पेच निर्माण केला आहे. भाजपने राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी देत प्रणिती शिंदेंसमोर मोठं आव्हान उभे केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तर प्रणिती पुन्हा आमदारकीकडे वळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आडम मास्तरांच्या अटीने प्रणिती शिंदे आणि काँग्रेससमोर मोठा पेच उभा राहिला आहे.