‘सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते,’ अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना चिमटा काढला. सातपुते मूळचे बीडचे आहेत. त्यामुळे ते ‘बाहेरचे’ असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला. त्यांच्या पत्राला सातपुतेंनी पत्रातूनच उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये लेटरवॉर सुरू झालं आहे.
इथला विरुद्ध बाहेरचा
‘मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीनं प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय,’ अशा शब्दांमध्ये आपण २०१९ पासून सोलापूरचेच असल्याचं सातपुतेंनी स्पष्ट केलं आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील सदस्य
पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात सातपुतेंनी स्वत:च्या अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधलं. ही लढत सामान्य कार्यकर्ता विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची कन्या अशी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करुन सार्थ ठरवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन,’ असं सातपुतेंनी पत्राच्या अखेरीस म्हटलं आहे.