• Mon. Nov 11th, 2024

    सेनेच्या ४ खासदारांचा पत्ता कट? शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव; मुख्यमंत्री काय करणार?

    सेनेच्या ४ खासदारांचा पत्ता कट? शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव; मुख्यमंत्री काय करणार?

    मुंबई: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. दिल्लीत काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर नेते महाराष्ट्रात परतले.

    भाजप सर्वाधिक २८ ते ३२ जागा लढवेल. तर शिवसेना १२ ते १५, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ ते ६ जागा सोडल्या जाऊ शकतात. मनसे सोबत आल्यास त्यांच्यासाठी १ जागा सोडली जाऊ शकते. शिंदेंसोबत सध्या १३ खासदार आहेत. माझ्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका, त्यांच्या जागा शिवसेनेसाठी सोडा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली होती. त्यावेळी शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते.
    राष्ट्रवादीची ऑफर धुडकावली, अखेर राजेंना शहांची भेट मिळाली; सातारच्या जागेचा प्रश्न निकाली
    शिंदेंच्या १३ खासदारांपैकी ४ जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिंदेंचे ४ खासदार डेंजर झोनमध्ये असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. हिंगोली, यवतमाळ-वाशिम, शिर्डी, कोल्हापुरात नव्या चेहऱ्यांना संधी द्या. तरच तिथे निभाव लागेल, अशा सूचना भाजपकडून करण्यात आल्या आहेत. या माहितीला सेनेच्या माजी मंत्र्यानं दुजोरा दिला आहे. ‘इंडिया टुडे’नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    हिंगोली, यवतमाळ-वाशिम, शिर्डी, कोल्हापूरचे विद्यमान खासदार गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना भाजपकडून आलेल्या सूचनांची कल्पना दिली. त्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. जागावाटपावरुन कोणतेही मतभेद नाहीत. ते लवकरच जाहीर केलं जाईल. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात आल्याचं मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितलं.
    दिल्लीत महायुतीच्या बैठकांचं सत्र, रात्री ठरलं जागावाटपाचं सूत्र; फॉर्म्युला फिक्स
    भाजपचे रामदास पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या जागी रामदास पाटील यांना संधी मिळू शकते. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळींची उमेदवारीही धोक्यात आहे. तिथे शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. ते बंजारा समाजातून येतात.
    राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती; सावध भाजपकडून महत्त्वाचा निर्णय
    शिर्डीची जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सदाशिव लोखंडे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांची उमेदवारी धोक्यात आहे. या मतदारसंघासाठी मनसेही आग्रही आहे. मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकर यांचं नाव शिर्डीसाठी आघाडीवर असेल. कोल्हापुरातून काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी जाहीर केली आहे. ते राजघराण्यातून येतात. भाजप इथून समरजीत घाटगेंच्या नावासाठी आग्रही आहे. तेदेखील राजघराण्यामधून येतात. शिवसेनेचे संजय मंडलिक कोल्हापूरचे विद्यमान खासदार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed