मराठा समाजाची राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी अंतरवालीच्या मैदानावर मंडप उभारण्यात आला आहे. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होत आहे.
पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची निर्णय बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त असणार आहे. या बैठकीसाठी पोलिस प्रशासनाकडून २७ पोलिस अधिकारी, १७३ पोलिस कर्मचारी, दोन आरसीपी तुकड्या असा २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मनोज जरांगे काय निर्णय घेणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी निर्णायक बैठक बोलवली आहे. मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्या दरम्यान त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर गावागावातून मराठा समाज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहे या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या बैठकीत मनोज जरांगे काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल.