• Sat. Sep 21st, 2024

मुंबईत असह्य उकाडा, आम्हाला हिट इंडेक्स कधी कळणार? नागरिकांचा हवामान विभागाला सवाल

मुंबईत असह्य उकाडा, आम्हाला हिट इंडेक्स कधी कळणार? नागरिकांचा हवामान विभागाला सवाल

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारचा दिवस असह्य उकाड्याचा होता. जाहीर तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होत असल्याने मुंबईकरांना अधिक त्रास झाला. या पार्श्वभूमीवर उष्णता निर्देशांक जाहीर करण्याचे भारतीय हवामान विभागाने गेल्या वर्षी दिलेले आश्वासन केव्हा पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे. मात्र हा उष्णता निर्देशांकाचा आकडा नागरिकांना प्रत्यक्ष समजण्यास आणखी काही काळ जावा लागेल अशी चिन्हे आहेत.

पावसाळ्याच्या आधी वातावरणात आर्द्रता वाढली की मुंबईमधील उकाड्याची तीव्रता वाढू लागते. शुक्रवारी मुंबईमध्ये कमाल तापमान सांताक्रूझ येथे ३५.४ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस होते. गुरुवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते तर, कुलाबा येथे ३६.३ अंश सेल्सिअस. समुद्रावरून येणारी हवा शुक्रवारी लवकर आल्याने मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली. मात्र सध्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा झालेली जाणीव अधिक होती. मुंबईमध्ये गुरुवारी सांताक्रूझ येथे २१ टक्के तर कुलाबा येथे ३३ टक्के सापेक्षा आर्द्रता होती. ही आर्द्रता शुक्रवारी अनुक्रमे ७६ टक्के आणि ७० टक्के होती. आर्द्रतेमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांना अधिक तापमान जाणवल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे आणि सुषमा नायर यांनी सांगितले.

ही जाणीव येत्या ४८ तासांमध्ये कमी होईल असाही अंदाज त्यांनी वर्तवला. उकाड्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या जाणिवेमुळे मुंबईकरांनी गेल्या वर्षी मिळालेल्या आश्वासनानुसार उष्णता निर्देशांकाचा आकडा कधी कळेल अशी विचारणा केली. मात्र सध्या हे प्रयोगात्मक पातळीवर असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुण्यातील भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनीही उष्णता निर्देशांकाचे आकडे सध्या उपलब्ध नसून एप्रिलपासून हे प्रत्यक्ष आकडे दिले जातील असा अंदाज वर्तवला. या संदर्भात काही समीकरणे, मॉडेल याची चाचपणी होत आहे.
मतटक्क्यापुढे आव्हान रणरणत्या उन्हाचे; निवडणुकांदरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेच्या शक्यतेमुळे आयोगाची परीक्षा
केवळ श्रेणीची नोंद

भारतीय हवामान विभागाच्या मौसम डॉट आयएमडी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून या उष्णता निर्देशांकाचा थेट आकडा दिला जात नाही. मात्र या निर्देशांकाची श्रेणी नोंदवली जात आहे. यामध्ये उष्णता निर्देशांक ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी, ३५ ते ४५ अंश, ४६ ते ५५ अंश आणि ५५ अंशांच्या पुढे अशा चार श्रेणी आहेत. या श्रेणीनुसार मुंबईमध्ये शुक्रवारी ३५ ते ४५ अंशांदरम्यान उष्णता निर्देशांक होता. तर सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हा निर्देशांक ४६ ते ५५ अंशांच्या पुढे असल्याची नोंद झाली. या माध्यमातून आगामी चार ते पाच दिवसांसाठीचा उष्णता निर्देशांकाचा अंदाजही उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed