• Sat. Sep 21st, 2024
Holi 2024: जळो सर्व दोष, जळो सर्व ईर्ष्या; आज होलिकादहन, उद्या धूळवड

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राग, मत्सर, हेवेदावे, अहंकार आदींना तिलांजली देत एकमेकांतील मैत्री, बंधुत्व, प्रेम, शांतीचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा संदेश होळीचा सण देत असतो. या पार्श्वभूमीवर आज, रविवारी पारंपरिक पद्धतीने होलिकादहन होणार आहे.

भक्त प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र, भगवान श्रीविष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून खाक झाली, अशी आख्यायिका सर्वपरिचित आहे. तेव्हापासून होलिकादहनाची प्रथा पडल्याचेही सांगण्यात येते. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने त्याचदिवशी होळी पेटविण्यात येते, असे जाणकार सांगतात.

होळीनिमित्त शहरातील काही गौरक्षण संस्थांनी शेणाच्या गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लाकूड जाळून पर्यावरणाचे नुकसान करण्याऐवजी शेणाच्या गोवऱ्या, चाकोल्या जाळून पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले आहे. होळीचा सण असल्याने घरोघरी पुरणपोळी, वडा, कढी असा पारंपरिक मेन्यू तयार होणार असून पुरणपोळी-वड्याचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. चौकात, मोकळ्या जागेवर, मैदानावर पेटणाऱ्या सार्वजनिक होळींशिवाय काही खासगी होळीदेखील छोट्या स्वरूपात पेटणार आहेत.

शाळा, कॉलेजांत रंगला रंगोत्सव

यंदा होळी रविवारी अर्थात सुटीच्या दिवशी आली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजांत शनिवारी होळीचा सण साजरा करण्यात आला. महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकमेकांना रंग, गुलाल लावत होळीच्या सणाचा आनंद लुटला. एकमेकांना ‘हॅप्पी होली’ म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. सीबीएसई शाळांमध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्यांना शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटी राहत असल्याने शुक्रवारी इकोफ्रेंडली होळी खेळण्यात आली. लहान मुलांचे ‘क्युट’0 व्हिडीओ बनवून पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शिक्षकांनी अपलोड केले आहेत. या माध्यमातून लहानवयातच मुलांना भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांची माहिती कळावी, हा उद्देश असल्याचे सांगत होळीचा सण उत्साहात साजरा झाला.

उधळीत येरे गुलाल…! सलग सुट्ट्यांमुळे यंदा होळी, धुळवडीच्या उत्साहाला उधाण
व्यापाऱ्यांचे आज होळीमिलन

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात एनव्हीसीसीतर्फे शहरातील व्यापाऱ्यांचे होळीमिलन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज, रविवारी सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्लब येथे सायंकाळी ४.३० वाजता होईल. या कार्यक्रमाला मोहन चाईथानी, संतोष काबरा, योगेश बंग यांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हेमंत गांधी आणि उमेश पटेल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed