अहवाल कोणाचा?
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट या राष्ट्रीय संस्थेने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या ‘भारताची पर्यावरणीय सद्यस्थिती २०२४’ या अहवालामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासकांनी निवडलेल्या चार शहरांपैकी पुण्यात भूपृष्ठभागाचे सरासरी तापमान सर्वाधिक होते. दिल्लीमध्ये ४८.७७, जयपूरमध्ये ४७.६३ आणि कोलकतामध्ये ४१.९९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दिल्ली आणि राजस्थानमध्ये उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४५ पर्यंत जातो. तेथील उन्हाळा अधिक तीव्र असला तरी भूपृष्ठभागावरील म्हणजेच जमिनीपासून चार फूट अंतरापर्यंतचे तापमान पुण्यामध्ये सर्वाधिक असल्याचे अहवालात आकडेवारीसह प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उष्णतेची बेटे तयार
गेल्या दहा वर्षांत शहरातील काँक्रिटीकरण काही पटीने वाढले असून, उपनगरांच्या बाहेरही वसाहती विस्तारल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे वृक्षाच्छादन कमी होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचेही प्रमाण कमी झाले आहेत. त्यामुळे सूर्याची किरणांमधून येणारी उष्णता परावर्तीत होण्याऐवजी काँक्रिट, डांबर आणि काचेच्या इमारती शोषून घेत आहेत. भूपृष्ठावरील वाढलेल्या उष्णतेमुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरात ८० टक्के भागात उष्णतेची बेटे (अर्बन हिट आयलंड) तयार झाली आहेत. शहरामध्ये सरासरी २५ टक्के वृक्षाच्छादन, किंवा दरडोई नऊ चौरस मीटर हरिताच्छादित भाग असावा, असा जागतिक आरोग्य संघटेनेचा निकष आहे. पुण्यात हे प्रमाण केवळ १.४ चौरस मीटर आहे. दिल्ली, जयपूर आणि कोलकताच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याची माहिती अहवालात दिली आहे.
‘किरणे पर्यावर्तीत नाहीत’
‘हवामान विभागातर्फे दररोज वातावरणातील तापमानाचे आकडे प्रसिद्ध केले जातात. जमिनीवरील म्हणजेच भूपृष्ठावरील तापमान यापेक्षा वेगळे असते. शेतात, वृक्षाच्छादित प्रदेशात, जलाशयालगतच्या आवारातील भूपृष्ठाचे तापमान कमी असते. शहरातील दाट वस्ती, काँक्रिटचे रस्ते, डांबरीकरण झालेल्या भागात सूर्याची किरणे परावर्तीत होत नाही, त्यांची उष्णता भूपृष्ठालगतच राहते, त्यामुळे तिथे तापमान जास्त नोंदवले जाते. पुण्याची आज हिच परिस्थिती झाली आहे,’ अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (आयआयटीएम) वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिली.
कारणे काय?
– नव्या पद्धतीच्या इमारती उष्णता धरून ठेवतात
– काँक्रिटच्या रस्त्यांमधून पावसाचे पाणी मुरत नाही, उष्णता शोषली जाते
– तापमान जास्त असल्यास रात्रीही उष्णतेचा झळा वाहतात
– झाडांची संख्या कमी असलेल्या भागात तापमान अधिक नोंदवले जाते
– काचेच्या इमारती, तेथील वातानुकीलीत यंत्रणाही त्रासदायक
काय आहे स्थिती?
सर्वाधिक तापमान असलेले भाग : येरवडा, लोहगाव, नगर रस्ता परिसर, विमाननगर, हडपसर, वडगाव शेरी, बाणेर-बावधन, हडपसर, कात्रज, कोंढवा
कमी तापमान नोंदवले जाणारे भाग : पाषाण, औंध, एनडीए परिसर, मध्यवर्ती पुणे, कोथरूड, सहकारनगर, सिंहगड रस्ता (धायरीपासून पुढे डोणजेच्या दिशेचा परिसर)