• Sat. Sep 21st, 2024

मुंबईतील खड्ड्यांवर दंडाचा मुलामा, कंत्राटदारावर कारवाईचे महापालिकेचे नियोजन

मुंबईतील खड्ड्यांवर दंडाचा मुलामा, कंत्राटदारावर कारवाईचे महापालिकेचे नियोजन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे रस्ते अगदीच अवघड होऊन जातात. विविध यंत्रणांकडून खड्डेमुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या, तरी हा प्रश्न दर पावसाळ्यात उभा राहतोच; परंतु आता सुकर रस्तेप्रवासासाठी मुंबई महापालिकेने दंडाचा बडगा उगारण्याचे ठरवले आहे. हमी कालावधीत नवी रस्त्यांवर खड्डे पडल्यास कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची तरतूद करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. आगामी काळातील रस्तेकामांच्या कंत्राटांमध्ये या अटीचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून पावसाळ्याआधी मे महिन्यापासूनच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू असते. मात्र खड्ड्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. याबाबत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले होते. खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२३मध्ये मुंबई महापालिकेला दिले होते. यानंतर रस्त्यांची दिवसा पाहणी आणि लागलीच रात्री खड्डे बुजवणे, अशी मोहीमच पालिकेने हाती घेतली होती. प्रत्येक विभागस्तरावर सहायक आयुक्तांची खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी म्हणूनही नेमणूक केली होती. शिवाय रस्ते काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र दरवर्षी खड्ड्यांना सामोरे जावे लागते.

मनसे शिवसेनेत विलीन करा, अध्यक्ष व्हा! भाजप, सेनेकडून प्रस्ताव; राज ठाकरे काय करणार?

मुंबईत दोन हजार ५० किमीचे रस्ते असून, यापैकी ५० टक्क्यांहून अधिक रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण झाले आहे. सुमारे ४०० किमी रस्त्यांची कामेही केली जात आहेत. आगामी काळात होणाऱ्या रस्तेकामांनंतर रस्त्यांवर खड्डे पडू नयेत आणि कंत्राटदारांना जरब बसावी, यासाठी दंड आकारण्याची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. सध्या सिमेंट-काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांसाठी पाच वर्षे आणि डांबरी रस्त्यांसाठी तीन वर्षांचा हमी कालावधी आहे. यात रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावरच असून, दंडाची तरतूद मात्र नाही. त्यामुळे तशी तरतूद महापालिकेकडून केली जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मास्टिक तंत्रज्ञानाचाच वापर

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाचाच वापर करण्यावर भर आहे, अशी माहिती देण्यात आली. यामुळे खड्डे बुजवताना रस्ता पूर्णपणे नवीन होणार आहे. १२ इंचापेक्षाही मोठा खड्डा असल्यास तो कोल्डमिक्स तंत्रज्ञानाऐवजी मास्टिक सरफेसने बुजवला जाणार आहे. सध्या खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून नवे कंत्राट दिले जाते. २४ तासांत खड्डे न बुजवणाऱ्या आणि रस्त्यांच्या परिरक्षणाबाबत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडआकारणी केली जाते. मात्र रस्तेकामे करणाऱ्या कंत्राटातील हमी कालावधी नियमात ही तरतूद नाही.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विसर, मुख्यमंत्री येणार कळताच खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची लगबग!

इतके खड्डे बुजवले…

वर्ष संख्या

२०२० ६५ हजार ६१७

२०२१ ४३ हजार ४७८

२०२२ ३८ हजार ३१०

२०२३ ७२ हजारांहून अधिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed