• Wed. Nov 13th, 2024

    नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

    ByMH LIVE NEWS

    Mar 23, 2024
    नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

    मुंबई, दि.23 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत श्री. एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहुल तिडके,  अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

    पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

    आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर – 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

    पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदारांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

    9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकूण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

    10 – नागपूर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकूण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.

    11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकूण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.

    12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकूण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

    13-चंद्रपूर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकूण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.

    निरीक्षकांची नियुक्ती

    भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, एससीएस, भारतीय वनसेवा, राजपत्रित  अधिकारी  हे जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक,पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले जातात. सन 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील निरीक्षक अधिका-यांचे प्रशिक्षण भारत निवडणूक आयोगाकडून दि.11.03.2024 रोजी नवी दिल्ली येथे व आभासी प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून या निरीक्षक अधिकाऱ्यांची निवडणूक टप्प्यांनुसार लोकसभा मतदार संघामध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात 5 जनरल निरीक्षक, 6 खर्च निरीक्षक व 3 पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

       कायदा व सुव्यवस्था : 13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

          लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 निप:क्षपाती व शांततापूर्वक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्याअंतर्गत दि.22 मार्च रोजी  सकाळी 6 वाजेपर्यंत 308 परवाना नसलेली शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 77 हजार 148 शस्र परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्त्रांच्या अनुषंगाने ताब्यात घेणे, जप्त करणे किंवा मुभा देणे इ. कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित कार्यवाही सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी प्रमाणे 13 हजार 141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दि.16 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून, प्रथम टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची दि.19 व 20 मार्च 2024 या कालावधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय सरमिसळ करण्यात आलेली असून प्रथमस्तरीय सरमिसळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन्सची विभागणी करण्यात आली आहे.

    आदर्श आचारसंहितेबाबत :- भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च च्या प्रसिद्धीपत्रकान्वये लोकसभा  सार्वत्रिक निवडणूक- 2024  चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यानुसार  महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्तीची थोडक्यात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

    सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 साठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) कळविण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत अंमलात आणावयाची तत्वे सर्व संबधितांना निदर्शनास आणण्यात आलेल्या आहेत.

    सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथकाच्या प्रमुखांना दि.16 मार्च ते दि.6 जून या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करुन फौ.प्र.संहिता-1973 च्या कलम (129), (133), (143) व (144) खालील शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत राज्य शासनाच्या एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करणे वा आचारसंहितेमधून सूट देणे या करिताचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरिता छाननी समिती गठित करण्यात आलेली आहे.

    भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सर्व पक्षांना व अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक संभाषणाच्या घसरत्या पातळीबद्दल व प्रक्षोभक भाषण टाळण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

    सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भातील महाराष्ट्र राज्याचा 24, 48 व 72 तासाचा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला  आहे.

    पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. मतदान केंद्रांवरील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांना कळविण्यात आले आहे.

    माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष

    राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

    माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्यूजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे.  जिल्हा स्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अधिनस्त माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

    माध्यम  पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती

    राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडिओ/ संदेश यांचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती व अपिलीय समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सुरु आहे.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार मार्गदर्शिका तयार केली आहे. सदर मार्गदर्शिका राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण दोन कोटी 72 लाख 40 हजार मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी दोन कोटी 17 लाख 92 हजार, हिंदी 40 लाख 86 हजार) व इंग्रजी 13 लाख 62 हजार मतदार मार्गदर्शिका छपाई करुन त्याचे वाटप करण्याबाबत संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सदर मार्गदर्शिकेची छपाई करुन जिल्ह्यांना वाटप करण्याची कार्यवाही संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सुरु आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस व मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यासाठी संबंधित विभागास कळविण्यात आलेले असून कामगारांसाठी  मतदाना दिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय दि. 22 मार्च रोजी उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे. गृह विभागाकडून कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतची व सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

            85 वर्षावरील  वरिष्ठ नागरिक, दिव्यांग  मतदारांना गृह मतदानाची सुविधा

    85 वर्षावरील  वरिष्ठ नागरिक तसेच 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व  असलेले मतदार यांना त्यांची इच्छा असल्यास गृह मतदान सुविधा राज्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूकांमध्ये प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तथापि, त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. मात्र गृह मतदानाच्या सुविधेसाठी अर्ज केल्यास त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed