छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याशी संबंधित विषयांच्या नियमांचा अभ्यास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज ‘वाचन लेखन दिवस’ अंमलात आणण्याचे निर्देश दिले होते. त्यास प्रतिसाद देत आज जिल्हा प्रशासनाने ‘एक दिवस अभ्यासाचा’ हा अनुभव घेतला. ‘पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकीसाठी कर्मचारी-अधिकारीप्रशिक्षित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. जिल्ह्याभरात तब्बल १००० हून अधिक अधिकारी-कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले.
निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक नोडल अधिकारी, त्यांचे अधिनस्त कर्मचारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना सोपविण्यात आलेले कामकाज बिनचूक व वेळेत व्हावे यासाठी कामकाजाच्या विषयाच्या नियमांचा अभ्यास करावा, आणि आपापल्या विषयात पारंगत व्हावे, ही भूमिका घेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आज वाचन लेखन दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा मुख्यालयापासून ते तालुकापातळीवर प्रत्येक ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वाचन लेखन व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज जिल्हा मुख्यालयात तसेच १०६ फुलंब्री मतदार संघासाठी गरवारे फिल्म्स लिमिटेड चिकलठाणा, १०७ औरंगाबाद मध्य साठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा, १०८ औरंगाबाद पश्चिम साठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा रेल्वेस्टेशन रोड, १०९ औरंगाबाद पूर्व साठी सेंट फ्रांसिस हायस्कूल जालना रोड येथे स्थापित केलेल्या वाचन लेखन अभ्यास कक्षास भेट दिली. पाहणी केली. तेथे जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी थोडावेळ संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत काम करताना आपल्याला नेमके काय काम करावयाचे आहे त्या नियमांची, कार्यपद्धतीची इत्तंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपापल्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने कामकाजाच्या प्रत्येक बाबीचा बारकाईने व सखोल विचार करुन नियम व कार्य पद्धती मुद्देनिहाय लेखी स्वरुपात दिली आहे. त्यामुळे जर आपण या पद्धतीचे लक्षपूर्वक वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष काम करतांना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळेच आजचा हा वाचन लेखन दिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले,असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा मतदारसंघनिहाय या अभ्यासासाठी प्रत्येक ठिकाणी नियमांच्या पुस्तिका, वाचन लेखन सामुग्री उपलब्धता करण्यात आली होती. आज दिवसभर सकाळी १० वा. पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. शांत वातावरणात प्रत्येकाने आपापले विषय वाचून अभ्यासले. आवश्यक टिपणे काढली. सर्वच ठिकाणी अल्पोपहार, चहा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवून निवडणूक विषयक नियमांचा, कायद्यांच्या, करावयाच्या कार्यवाहीच्या पुस्तिकांचा अभ्यास केला.