• Sat. Sep 21st, 2024
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशकात पडसाद, ‘आप’ कार्यकर्ते आक्रमक, निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील मेहेर चौकात टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे येथील वाहतूक खोळंबली होती.
भाजपची तिसरी यादी अंतिम टप्प्यात, पंकजांच्या दुसऱ्या बहिणीचाही पत्ता कट? चौघांवर टांगती तलवार
पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. केंद्र सरकारकडून सुरू असलेला ‘ईडी’चा गैरवापर त्वरित थांबवावा, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे करण्यात आली. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. या अटकेचे पडसाद देशभर उमटत असून, नाशिकमध्येही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केजरीवाल यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ ‘ईडी’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता रस्त्यावर उतरले. सोबत आणलेले टायर मेहेर चौकात जाळून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ‘मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी’, ‘जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी मोदीशाही नहीं चलेगी’ यांसारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.पोलिसांनी हिंमत असेल, तर राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान यावेळी देण्यात आले. या आंदोलनामुळे सीबीएस चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर झोपून वाहतूक रोखून धरणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून बाजूला नेले. काही कार्यकर्त्यांना वाहनात टाकून सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘आप’चे शहराध्यक्ष अमोल लांडगे, माजी शहराध्यक्ष गिरीश उगले, एन. एस. दाणी, अनिल कौशिक, मंजूषा जगताप आदी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाने आंदोलने, निदर्शने न करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश काढले असून, या आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच ‘आप’ने आव्हान दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातही अटकाव

आंदोलकांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये दाखल झाले. तेथेही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. पर्स, मोबाइल, तसेच अन्य कोणतीही वस्तू अधिकाऱ्यांच्या दालनात घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. या वस्तू तुमच्याजवळ ठेवा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली. ‘आम्ही काय तुमच्या वस्तू सांभाळण्यासाठी आलो आहोत का,’ असा प्रश्न पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळे जवळील सर्व वस्तू एका कार्यकर्त्याकडे सोपवून काही महिला व पुरुष कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यासाठी गेले. ‘ईडी’चा गैरवापर तत्काळ थांबविण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. केजरीवाल यांची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांच्या बदनामीचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.

‘निर्भय महाराष्ट्र’चेही निवेदन

गुंड प्रवृत्तीच्या अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई न करता केंद्र सरकारने ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचा निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फेही निषेध करण्यात आला. निवडणूक आयोगाला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विनंतीपत्र देण्यात आले. केजरीवाल यांच्या सुटकेसाठी तत्काळ आदेश जारी करा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कृतीची सखोल चौकशी करा, राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या कोणत्याही गैरवापरासाठी आणि राज्य संस्थांमध्ये हेराफेरीसाठी जबाबदारी सुनिश्चित करा, सरकारी संस्थांकडून होणारा हस्तक्षेप थांबवून सर्वांना समानतेने वागवा, असे निवेदन जितेंद्र भावे, जगबीर सिंग आदींनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed