• Sun. Sep 22nd, 2024

अपघातात डोक्याला जबर मार, महिला वेदनेनं विव्हळत होती, पण कोणीही आलं नाही, घोडबंदर रोडवरील घटना

अपघातात डोक्याला जबर मार, महिला वेदनेनं विव्हळत होती, पण कोणीही आलं नाही, घोडबंदर रोडवरील घटना

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : घोडबंदर रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला असून, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदतही मिळत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य पडून महिला गंभीर जखमी झाली. महिलेच्या पतीने मदतीसाठी वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच थांबले नाही. अखेर पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

काय घडलं?

मिरारोड पूर्वेकडील हटकेष परिसरात वास्तव्यास असलेले राजीव थानवी (३७) आणि त्यांच्या पत्नी अक्षता (३६) घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली येथील कंपनीत काम करतात. त्यांच्या कामाची वेळ पहाटे ३.३० ते दुपारी १ अशी आहे. बुधवारी पहाटे दोघेही घरातून दुचाकीवरून कामावर जाण्यास निघाले. ३.५० वाजता घोडबंदर रस्त्यावरील भाईंदर पाडा येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे घसरत गेली आणि थानवी दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडले. एका बाजूला पडलेले राजीव उठले आणि पत्नीकडे गेल्यानंतर पत्नीच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी पत्नीला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी बेशुद्ध होती. राजीव रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मदतीसाठी आवाज देत होते. परंतु, त्यांच्या मदतीला कोणीच थांबले नाही. ज्या वाहनांमुळे हा अपघात झाला, तो चालकही थानवी दाम्पत्याला मदत न करता पळून गेला होता. त्यामुळे राजीव यांनी आईला, तसेच कार्यालयात फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी आई, भाऊ यांनी धाव घेतली. तसेच, राजीव यांनी पोलिसांना फोन करून मदत मागितली. थोड्याच वेळात कासारवडवली पोलिस त्याठिकाणी आले. पोलिसांनीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करत अक्षता हिला सिव्हिल रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून अक्षताचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातानंतर दुचाकीवरून पडून अक्षता हिच्या डोक्यावरून चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला असून, या अपघातामध्ये राजीव यांच्याही उजव्या पायाच्या गुडघ्यास आणि डाव्या हाताच्या कोपरास दुखापत झाली आहे. राजीव यांच्या तक्रारीनंतर अपघताला जबाबदार ठरलेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणाची देखील पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.
धुमधडाक्यात लग्न, पण दाम्पत्याला नातं नकोसे; तीन दिवसांतच घेतला घटस्फोट, काय घडलं असं?
घोडबंदवर वारंवार अपघात

गेल्या काही महिन्यात घोडबंदर रस्त्यावर सातत्य़ाने अपघात होत असून, या अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहे. ११ मार्च रोजी घोडबंदर रस्त्यावर वेगातील वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी अनेक जीवघेणे अपघात घडल्याने हा घोडबंदर रस्ता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed