अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंसोबत गेल्याने ठाकरेंना भाजपातून भाऊसाहेब वाकचौरे यांना आयात करावे लागलेय. तर दुसरीकडे विद्यमान खासदारावर असलेल्या नाराजीमुळे शिंदे दुसरा उमेदवार देतील असे चित्र आहे.
२००९ आणि २०१४ साली श्रीरामपूरचे आमदार राहिलेले, तर २०१९ साली शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढवलेले भाऊसाहेब कांबळे यांनी गुरुवारी रात्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आता भाऊसाहेब वाकचौरे विरूद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे मनसे जर महायुतीत सहभागी झाली तर शिर्डीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार अशीही चर्चा आहे. तर रामदास आठवलेंनीही शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. काँग्रेस आणी भाजपही जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे दिवसागणिक शिर्डी लोकसभेच्या जागेची चर्चा जोर धरत असून नेमकी जागा कुणाला मिळणार? आणि उमेदवार कोण असणार? याची उत्कंठा लागलेली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भाऊसाहेब कांबळेंच्या सेना प्रवेशामागे विखेंचा डाव?
श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि सध्या भाजपात असलेले विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे उघडपणे विखे पाटलांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत असून त्यामुळे विखे पाटलांची लोखंडेंवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच विखे पाटलांनी लोखंडेंना धक्का देत भाऊसाहेब कांबळेंना शिंदे गटात ओढत नवीन डाव टाकलाय का? याची चर्चा सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात होत आहे.
