• Mon. Nov 25th, 2024

    शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा

    शिवतारेंनी युतीधर्म पाळला नाही, तर मावळमध्ये उद्रेक; अजितदादांच्या आमदाराचा शिंदेंना थेट इशारा

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवतारे जर बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्म पाळणार नसतील तर आम्हीही मावळ लोकसभा मतदारसंघात उद्रेक करु, असा थेट इशारा बनसोडेंनी दिला आहे. विजय’बापू’ शिवतारेंच्या पवित्र्याने ते महायुतीच्या ‘सेहत’साठी ‘हानिकारक’ ठरताना दिसत आहेत.

    अण्णा बनसोडे काल पत्रकारांसोबत संवाद साधताना बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार असल्यामुळे मतदारसंघात एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्धव ठाकरेंकडून संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. मात्र विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना महायुतीकडूनच विरोध होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये शिवतारे अजित पवारांना डिवचत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.
    एकदा ठरलं की ठरलं, धंगेकरांना तिकीट मिळताच वसंत मोरेंचं WhatsApp स्टेटस, पुण्यात तिरंगी लढत
    बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. अजून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी प्रचार आणि भेटीगाठींवरुन अंदाज बांधला जात आहे. मात्र त्यात खोडा घालत शिवतारेंनी जुना वचपा काढण्याचा ठरवलं आहे.
    अजितदादांवर टीकेची तोफ सुरुच, शिवतारे वरिष्ठांनाही जुमानेनात, शिस्तभंगाच्या कारवाईची तलवार
    तीन दशकांपासून पवार घराण्याचे बारामतीवरील वर्चस्व संपवण्याचा विडा उचलल्याचं शिवतारे म्हणतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज अजितदादांच्या आमदाराने थेट उद्रेक करण्याचा इशारा दिला आहे. या निमित्ताने महायुतीमध्ये सर्रास ब्लॅकमेलिंग वॉर सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    अण्णा बनसोडे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विजय शिवतारे जे वक्तव्य करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. महायुती सरकारमध्ये काम करत असताना अशा प्रकारची भूमिका घेणं ही योग्य गोष्ट नाही. जर शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात काम करत असतील, तर त्याचा उद्रेक हा महाराष्ट्रभर होईल, आणि याचे परिणाम मावळ मतदारसंघातही पाहायला मिळतील, असा थेट इशारा आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला आहे. आता हे नाराजीनाट्य दूर होणार की तिढा वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed