पुढे बोलताना पवार म्हणाले की, अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, केंद्रात मंत्री केलं. नवनवीन धोरणे राबवली. महिलांसाठी धोरण केली. या देशामध्ये महिलांना प्रॉपर्टीमध्ये अधिकार नव्हता. तो अधिकार त्यांना दिला. परंतु आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा राज्य चालवण्याचा प्रकार देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही, तिथे बदल व्हायला पाहिजे. त्यासाठी आलेली लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, म्हणत पवारांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मोदींचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही
अनेक देशांमध्ये घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. त्या देशामध्ये हुकूमशाही दिसून येते. हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये पाहिले आहे. बांगलादेशमध्ये रेहमान हे अध्यक्ष होते. त्यांची हत्या करण्यात आली आणि लष्कराने देश हातात घेतला. पाकिस्तान, श्रीलंकेमध्येही असेच घडले. लष्कर जेव्हा देश हातात घेते. तेव्हा तुमचे माझे सर्व अधिकार नष्ट होतात. असे व्हायचे नसेल तर घटनेचे रक्षण करणे हे तुमचे माझे कर्तव्य आहे. सुदैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपणाला अधिकार दिले आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातले आहे. याचे कारण म्हणजे गेली दहा वर्ष पार्लमेंटमध्ये मोदींचे राज्य आहे आणि मोदींचे या पार्लमेंटवर किती लक्ष आहे हे जर तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी मोदींनी पायरीवर साष्टांग नमस्कार केला होता आणि मी सन्मान करतो असे देशाला दाखवलं. आताच एक महिन्याचं पार्लमेंटचं सेशन संपलं. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात कितीदा आले, किती वेळेसाठी आले. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ एक दिवसासाठी आणि काही वेळेसाठीच आले होते. याचा अर्थ हाच होतो की, ही जी संसदीय लोकशाही आहे. त्याच्यावर त्यांचा किती विश्वास आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याची मला काळजी वाटते
माझ्यासारख्याला काळजी ही वाटते की, कर्नाटकातील भाजपाचे खासदार हेगडे आपल्या भाषणात म्हणाले की, ४०० पार आम्ही गेलो की मोदींना या देशातील घटना बदलायची आहे. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्या निमित्ताने स्पष्ट झाले. या देशाची घटना, जो तुमचा अधिकार आहे तेच जर हे लोक बदलणार असतील तर आपल्याला घटनेच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल, त्यासाठीच ही निवडणूक आहे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.