• Sat. Sep 21st, 2024
रायगडात सेना, भाजप, NCPचं वर्चस्व, शेकापची मतं गेमचेंजर ठरणार? मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची

रायगड: रायगड मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचेच या जिद्दीने कानाकोपऱ्यांत पक्षाने प्रवेश केला होता. मात्र, महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तरीही भाजपने या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी खासदार अनंत गीते यांची उमेदवारी निश्चित करून मतदारसंघात प्रचार बैठका सुरू केल्या आहेत. ठाकरे गटासोबतचे शरद पवार गट आणि शेकाप, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे भाजप व शिवसेना अशा मित्रपक्षांच्या ताकदीचीही ही परीक्षा ठरणार आहे.एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मोट बांधल्यानंतर रायगडमधून भाजप लोकसभा निवडणूक लढवणार हे नक्की झाले होते. पेणचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना प्रवेश देऊन भाजपने त्यांची दक्षिण रायगड अध्यक्ष म्हणून नेमणूकही केली. लोकसभेचा उमेदवार म्हणून धैर्यशील पाटील यांनी मतदारसंघात बांधणी केली. लोकसभेचे तिकीट मिळण्याच्या बोलीवरच त्यांनी ‘शेकाप’ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात प्रवेश झाला व रायगडमधील भाजपचे राजकीय गणित बदलले.
राजकारण: शिवसेना गड राखणार की नवीन पक्ष आपलं नाव कोरणार? धाराशीवचा संभ्रम कायम
सन १९८०मध्ये पेण मतदारसंघातील ए. टी. पाटील यांनी लोकसभेत रायगडचे प्रतिनिधित्व केले होते. यंदा या मतदारसंघासाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत. वरिष्ठ पातळीवर हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’ला देण्याचे अंतिम झाल्यास या मतदारसंघात धैर्यशील पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी किंवा मैत्रीपूर्ण लढत द्यावी यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत. जिल्ह्यातील ‘शेकाप’ची ताकदही लोकसभेसाठी निर्णायक ठरू शकेल.

Raigad

२००८मध्ये रायगड मतदारसंघाची पुनर्रचना होऊन रायगडमध्ये रत्नागिरी मतदारसंघातील गुहागर व दापोली हे विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आले, तर उरण, पनवेल, कर्जत व खालापूर हे विधासभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात गेले. रत्नागिरी मतदारसंघातून तीन वेळा, तर रायगड मतदारसंघातून सलग दोन वेळा असे सन २००९पासून २०१९पर्यंत पाच वेळा शिवसेनेच्या अनंत गीते यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. सन २०१९मध्ये सुनील तटकरे हे खासदार म्हणून निवडून आले. तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या राज्यात मंत्री व रायगडच्या पालकमंत्री झाल्या.

महामार्ग कळीचा प्रचारमुद्दा

मुंबई-गोवा महामार्ग हा सध्या प्रचारात सर्वात कळीचा मुद्दा आहे. पेणपासून अलिबागपर्यंतची रेल्वे सेवा प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. जिल्ह्यातील विकास व वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यात युवकांची बेरोजगारी वाढत आहे. समुद्र किनाऱ्यावरील बांधकाम बंधनासारख्या प्रश्नांवरही मतदानाची दिशा ठरणार आहे. भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची युती झाल्यानंतर या मतदारसंघातील अलिबाग व महाड येथील शिवसेनेचे दोन आमदार हे भाजपसोबत आले होते. मात्र, या युतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सहभागी झाल्याने भाजप दुय्यम स्थानावर गेल्याचे चित्र आहे. एकेकाळी तटकरे यांचे विरोधक असणारे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे आता उघडपणे तटकरे यांच्या खासदारकीच्या उमेदवारीचे समर्थन करीत आहेत, तर अखेरपर्यंत मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले महाडचे भरत गोगावले मात्र शांत आहेत.

स्मिताताईंना त्यांची मुलगी आहे सांभाळून घ्यायला, पण माझी परिस्थिती सर्वांना माहितीये : रक्षा खडसे

विधानसभा मतदारसंघांचे बळ

या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. पेणमध्ये भाजपचे रवीशेठ पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, श्रीवर्धनमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या अदिती तटकरे, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आमदार आहेत.

एकंदरीत या लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरीही रायगड जिल्ह्यात ‘शेकाप’ची मते महत्त्वाची ठरणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांचे बळ व महाडमधील काँग्रेसचे दिवंगत नेते माणिकराव जगताप यांचे समर्थन लाभले होते; परंतु या वेळी ‘शेकाप’ ‘इंडिया’ आघाडीसोबत आहेत. त्यामुळे यंदा कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल यावरच निकालाची गणिते ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed