राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी चंद्रपूर-आर्णी लोकसभेची मोठी चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला लागलेली आहे. त्याचे कारण ठरले २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा झालेला अनपेक्षित पराभव. २०१९ मध्ये काँग्रेसचे राज्यातील केवळ एकमेव विजयी खासदार बाळू धानोरकर ठरले. या एका विजयाने राज्य काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. हा पराभव भाजपाला जिव्हारी लागला. येथे विजय मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.
दुसरीकडे ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे.आमदार धानोरकर या लोकसभेचा विचार करणार नाहीत, असा काहींचा अंदाज होता. मात्र धानोरकर यांनी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगून पुढच्या तयारीला लागल्या.
त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. वडेट्टीवार यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा संपत नाही तोच त्यांची कन्या, प्रदेश युवक महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी या मतदारसंघातून निवडणक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे उमेदवारीचा घोळ वाढला. बुधवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा सुरू झाली. धानोरकर समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मात्र तासाभरातच विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे आले. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाचा गळ्यात पडेल हे अद्यापही निश्चित सांगता येत नाहीये.
असे सगळे वातावरण असतानाही आमदार धानोरकर यांनी २०१९ ची पुनरावृत्ती यंदाही होणार, अशी फेसबुकवर पोस्ट करीत ‘आपणच उमेदवार असू’ असे सूचक संकेत दिले आहेत. या पोस्टमुळे धानोरकर समर्थकांत उत्साह संचारला आहे. मात्र काँग्रेसने त्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. काँग्रेसच्या तिकीट वाटपाची संस्कृती बघता आनंदासोबतच समर्थकांत अस्वस्थता सुद्धा दिसून येत आहे.
