• Sat. Sep 21st, 2024
भाजपची तिसरी यादी अंतिम टप्प्यात, पंकजांच्या दुसऱ्या बहिणीचाही पत्ता कट? चौघांवर टांगती तलवार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तारूढ भाजप आणि काँग्रेस या पक्षांची तिसरी यादी एक-दोन दिवसांत जाहीर होणार, हे जवळपास निश्चित आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक वर्तमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा असून, यंदा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक खासदार ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या दुसऱ्या बहिणीचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुका ज्या ज्या टप्प्यांत होणार आहेत, त्या विभागांनुसार तिकिटांवर चर्चा करण्यात येईल. मात्र महाविकास आघाडीतही जागावाटपाची चर्चा सुरू असल्याने काँग्रेसच्या राज्यातील यादीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र व उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या भाजप सुकाणू गटांबरोबर गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी दीर्घ मंथन केले. या बैठकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा व नड्डा यांच्यात पुन्हा दीर्घ बैठक होणे अपेक्षित आहे. गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यावर याच आठवड्यात पक्षाची तिसरी यादी येणार असे मानले जाते.
श्रीकांत शिंदेंसमोर बिकट वाट, भाजपशी दिलजमाई, राजू पाटलांसोबत ‘मनसे’ काम, परांजपेंशीही दोस्तीचं आव्हान
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, ज्यांना दोनदा संधी देऊनही त्यांनी पक्षासाठी किंवा मतदारांसाठी भरीव काम केल्याचे दिसत नाही, अशा उमेदवारांबाबत पक्ष धोका पत्करणार नाही.

मुंबईतील एका खासदाराचा मतदारांशी संपर्कच तुटल्याचे अहवाल दिल्लीत आले आहेत. वादग्रस्त उमेदवारांच्याही नावांवर भाजप यापुढे फुली मारणार हे स्पष्ट आहे. भाजपच्या पहिल्या यादीत १९५ पैकी ३० विद्यमान खासदारांची, तर ७२ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत ३३ विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली. फक्त उमेदवारांची विजयाची क्षमता, हाच निकष सर्वांत महत्त्वाचा असल्याचे पक्षनेतृत्वाने वारंवार स्पष्ट केले आहे.
काँग्रेस उमेदवार निश्चित, मुंबईतून दोन फिल्मी कलाकारांची नावं चर्चेत, प्रदेशाध्यक्षही रिंगणात
पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे या भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भगिनी. प्रमोद महाजनांची कन्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबईतून खासदार आहेत. परंतु पूनम यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पंकजा मुंडे यांच्या सख्ख्या धाकट्या भगिनी प्रीतम मुंडे या बीडच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांचे तिकीट कापून पंकजांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता प्रीतम यांच्यामागून त्यांची दुसरी बहीण पूनम यांचाही पत्ता कट होण्याची चिन्हं आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

यांच्या उमेदवारीबाबत गूढ

जयसिद्धेश्वर स्वामी, सुनील मेंढे, अशोक नेते, पूनम महाजन (सारे महाराष्ट्र), बृजभूषण शरणसिंह, रीता बहुगुणा जोशी, वरुण गांधी, जनरल व्ही. के. सिंग, रमापती राम त्रिपाठी, संघमित्र मौर्य, सत्यदेव पचौरी, संतोष गंगवार (सर्व उत्तर प्रदेश)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed