• Tue. Mar 10th, 2026
    मराठा आरक्षणामुळे आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल, बापाला सोडायला गेला पुन्हा परतलाच नाही…

    गजाजन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १९ मार्च रोजी माळशेलू शेत शिवारात विलास श्रीराम वामन (वय २९) या तरुणाने रात्री १० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.माळशेलू येथील विलास वामन या तरुणाचं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असून काही दिवसांपासून खासगी दवाखान्यांमध्ये काम करायचा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तो सक्रिय सहभाग नोंदवत होता. परंतु नोकरी नसल्याने विलास वामन मागील काही दिवसापासून अस्वस्थ होता. वडिलांना मोटरसायकलवरून सोडण्यासाठी गेला असताना तो मात्र घराकडे परतलाच नाही. वडील रात्री घरी आल्यानंतर विलास घरी आला नसल्याचं कुटुंबाकडून कळाले असता सर्व कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
    Loksabha Election 2024: शरद पवार यांनी डाव टाकायला सुरुवात केली; पुण्यात भाजपला दिला धक्का

    रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची मोटरसायकल शेतात आढळून आल्यानंतर परिसरामध्ये पाहणी केली असताना झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. तात्काळ या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली, यावरून पोलीस निरीक्षक विजय राठोड व त्यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली.

    गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला. त्याच्या खिशामधून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळून आली. या प्रकरणी अद्यापही हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नाही. विलास यांना पत्नी, एक मुलगा, आई वडील असा परिवार असल्याचं सांगण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे माळसेलू गावावर शोककळा पसरली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed