मुंबई दि. २९ : पुण्यातील पाषाण येथे दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मानसिक आरोग्य केंद्र, पाषाण, पुणे येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ अतिविशेषोपचार रुग्णालय चालू करण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पाषाण येथील उपलब्ध जागा भविष्यातील विस्तारासाठी तसेच पुढील २० वर्षांचा विचार करून नियोजन करण्याच्या दृष्टीने अधिक जागेची आवश्यकता असल्याने येरवडा तसेच इतर उपलब्ध जागांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा. त्यानंतर नव्या जागेच्या उपलब्धतेनुसार अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. ससून रुग्णालयाच्या परिसरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने पुणे परिसरात पर्यायी जागेचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
राज्यात दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पुणेसह विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिटी सुविधा व रुग्णालये उभारण्यावर किंवा बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार मिळावेत हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
