मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नशामुक्त मुंबई अभियानात मुंबईकरांनी, विशेषतः युवक-युवतींनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त समाज घडविण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. या अभियानांतर्गत वर्षभर विविध पातळीवर उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ संदेश
या अभियानाच्या निमित्ताने मुंबईतील शाळा, महाविद्यालये, समुपदेशक, पालक आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमासोबतच शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार असून, प्रतिबंध, समुपदेशन आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रसार यावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘अंमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ हा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि युवकांना निरोगी व जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, अमली पदार्थांच्या विळख्यात युवक सापडू नयेत यासाठी आणि समाजात नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाद्वारे शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांना जोडून नशामुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक असून, सुरक्षित आणि सशक्त मुंबई घडविण्यासाठी नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी केले आहे.
0000
बी.सी.झंवर/विसंअ
