• Sat. Sep 21st, 2024

जळगाव-रावेरमध्ये महायुतीत कुरबुरी, सेनेला विधानसभेला हवी सहकार्याची ‘गॅरंटी’, भाजप टेन्शनमध्ये

जळगाव-रावेरमध्ये महायुतीत कुरबुरी, सेनेला विधानसभेला हवी सहकार्याची ‘गॅरंटी’, भाजप टेन्शनमध्ये

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : महायुतीच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे आहेत. दोन्ही जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. मित्रपक्ष शिंदे गट शिवसेना व अजित पवार गटासोबत नुकतीच भाजपाने बैठक घेतली. या बैठकीत भाजपच्या आतापर्यंतच्या सोयीच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत लोकसभेत मदतीच्या मोबदल्यात विधानसभेत भाजपाने शिंदे गटाच्या उमेदवारांना सहकार्याची गॅरंटी मागितली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीत अद्याप आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.

भाजपाच्या जिल्हा बैठकीनंतर काल मंगळवारी रात्री भाजपाच्या नूतन कार्यालयात महायुतीतील जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार किशोर पाटील, सुरेश भोळे, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, स्मिता वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील अनुपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांचा रक्षा खडसेंवर रोष

या बैठकीत शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त करतानाच रक्षा खडसेंना युती म्हणून मदत केल्यानंतर त्या निवडून आल्यावर त्यांच्याकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठे केले जातात. खासदार निधीची कामेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली जात असल्याचा आरोप केला जातो. खडसेंकडून होणाऱ्या टीकेला रक्षा खडसे का उत्तर देत नाहीत असा सवालही त्यांनी केला. भाजपा उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काम करु, पण विधानसभेच्या वेळेस आम्हाला भाजपाकडून मदत होईल याची ‘गॅरंटी’ काय? सवाल आमदार पाटील यांनी केला.

किशोर पाटलांनीही मागितली मदतीची हमी

पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी शिवसेना मदत करेलच, पण तसेच सहकार्य पाचोरा व भडगाव येथील तालुकाप्रमुख माझ्यासाठी विधानसभेला करतील का? याचे उत्तर मागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed