• Sat. Sep 21st, 2024

जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस नेते जाणार की नाही?

जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस नेते जाणार की नाही?

सांगली: सांगलीतील मिरजमध्ये उद्या (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेसाठी शरद पवार यांच्या गट उपस्थित राहणार आहेत. परंतु सांगलीची उमेदवारी काँग्रेसला जाहीर होत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे नाव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर करत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचे नेते देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत. याच दरम्यान मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडतीय. या सभेतून उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेसला जागा मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी देखील ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

उद्या दुपारी तीन वाजता मुंबईतून उद्धव ठाकरे हे सांगली येथे येणार आहेत. सांगली येथील वसंत दादा यांच्या स्मृर्ती स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर ते मिरज येथील सभेला उपस्थित राहणार आहेत, त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत हे देखील असतील.

शाहू महाराज छत्रपती यांची घेणार भेट

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली आणि काँग्रेसने आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महायुतीची डोकेदुखी वाढवल आहे. शाहू महाराजांचे नाव अधिकृतपणे घोषित करण्याचे केवळ औपचारिकता राहिले आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या कोल्हापुरात न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेणार आहेत. यामुळे या भेटीत काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागून राहिले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेते संजय पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे असणार आहेत. या भेटीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed