• Sat. Sep 21st, 2024
अखेर ठरलं, महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अखेर एकमत झाले असून यावर येत्या गुरुवारी मुंबईत अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच महाविकास आघाडी जागावाटप जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर होईल, असे वृत्त मंगळवारीच प्रसिद्ध केले होते.लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यातच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावून घेताना किती जागा द्यायच्या याबाबतही एकमत होऊ न शकल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सांगता सभेनंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या आधीच दिली होती. अखेर याबाबत मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा पूर्ण झाली. काँग्रेसच्या नेत्यांचे एकमत झाल्याचे कळते.
माढ्याच्या तिढ्यात महादेव जानकरांची उडी, माढ्याची जागा आम्हाला द्या, शरद पवारांकडे मागणी
या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची तातडीची अंतिम बैठक गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अद्याप आमंत्रित करण्यात आलेले नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed