• Sat. Sep 21st, 2024
भाजपचा आग्रह, शिंदे गटही ठाम; नाशिक लोकसभेवरुन महायुतीतील संघर्ष टोकाला

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटादरम्यानचा संघर्ष टोकाला पोहचला असून, या जागेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासमोरच भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ‘नाशिकचा खासदार कमळाचाच हवा’ अशी घोषणाबाजी करून अन्नत्याग आंदोलनाचा इशाराही दिला. शिवसेना शिंदे गटानेही जशास तसे उत्तर देत नाशिकचा भावी खासदार हा शिवसेनेचाच राहील. उमेदवार मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृतरीत्या जाहीर करतील, अशी भूमिका घेतली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार निवडीचा पेच कायम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे विरोधकांची ताकद कमी झाल्याचा फायदा उचलण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. नाशिकचे धार्मिक महत्त्व पाहता या जागेवरही दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीत नाशिकचा दौरा करून भाजपसाठी वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळे नाशिकची जागा ही भाजपकडे येईल असा स्थानिक नेत्यांचा कयास होता. मात्र, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज झाला आहे. भाजपने गोडसेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. त्यातच सोमवारी रात्री (दि. १८) प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या देत नाशिकची जागा भाजपलाच मिळण्याचा आग्रह धरला. आता वरिष्ठ पातळीवर नाशिकच्या जागेवर काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गोडसेंबाबत पक्षात संदिग्धता

भाजपच्या आक्रमकतेनंतरही शिवसेना शिंदे गटात स्थानिक पातळीवर शांतता आहे. गोडसे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिकच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार असून, अधिकृत उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोडसेंचीही उमेदवारी अधांतरी असल्याचे चित्र आहे.

घटक पक्षांची धाकधूक वाढली

नाशिकच्या जागेवरून भाजप-शिवसेना शिंदे गटात संघर्ष सुरू असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाशिकमध्ये महायुतीत धडधड वाढली आहे. मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. नाशिक हा मनसेचा गड असल्यामुळे राज ठाकरेंकडून नाशिकवर दावा ठोकण्याची शक्यता असल्याने शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटामध्ये चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही मंगळवारी (दि. १९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेवर दावा ठोकला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्यामुळे भाजपचे नाशिकचे शिष्टमंडळ हे मंगळवार ऐवजी आता आज, बुधवारी (दि. २०) मुंबईत भेटीला जाण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ
नाशिकची जागा भाजपनेच लढावी यासाठी कार्यकर्त्यांची भावना तीव्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत कळविण्यात आले आहे. भाजप नेते यावर निर्णय घेतील.- विजय चौधरी, सरचिटणीस, प्रदेश भाजप

नाशिकची जागा शिवसेना लढवणार हे निश्चित आहे. उमेदवार कोण असेल हे शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृतरीत्या जाहीर करतील. भाजपचा विरोध हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यावर भाजप नेत्यांनी मार्ग काढावा.- भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना (शिंदे गट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed