भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे ध्यये पक्षाने बाळगले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही महायुतीच्या समन्वय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, राहुल भंडारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, अजय भोसले, रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. मोहोळ यांच्या भेटीदरम्यान आपण नाराज नसल्याचे मुळीक यांनी सांगितले होते. मात्र, समन्वय बैठकीला माजी आमदार जगदीश मुळीक, त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी नगरसेविका रेखा टिंगरे आदी गैरहजर होते.
जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण
म. टा. प्रतिनिधी, येरवडा: भाजपकडून पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवासस्थानी भेट घेऊनही मुळीक बंधू नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सर्वांच्या भेटीगाठीवर भर द्यायला सुरुवात केली. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधानसभा मतदारसंघनिहाय महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या समन्वय बैठका घेत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची मंगळवारी युतीची समन्वय बैठक झाली. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयचे नेते आणि पदाधिकारी व विद्यमान आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते. मात्र, जगदीश मुळीक गैरहजर राहिले.