• Sat. Sep 21st, 2024

भीती कुणाची कशाला? शहरात ‘एमडी’ची तोलूनमापून विक्री, कॉलेजच्या गेटवरच थाटलेलं दुकान

भीती कुणाची कशाला? शहरात ‘एमडी’ची तोलूनमापून विक्री, कॉलेजच्या गेटवरच थाटलेलं दुकान

सौरभ बेंडाळे, नाशिक : नाशिक शहरातील मॅफेड्रॉन (एमडी) विक्री व साठ्याचा विळखा कायम असतानाच भाजीबाजाराप्रमाणे थेट रस्त्यालगत तोलूनमापून एमडी विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी उधळला. सामनगाव रस्त्यावर वजनकाटा घेऊन बसलेल्या आणि एमडी विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

काय प्रकार?

किरण चंदू चव्हाण (वय २३, रा. सामनगाव रोड) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५८ हजारांचे १९.३९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनची गस्त सुरू होती. अंमलदार विशाल कुंवर आणि समाधान वाजे यांना सामनगाव रोड परिसरात एकजण एमडी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सापळा रचण्यास सांगितले. सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून वजनकाट्यासह एमडी हस्तगत करण्यात आले. दरम्यान, संशयित किरण याने एमडी कोणाकडून आणले, त्याच्याकडे अधिक साठा आहे का, वजनकाट्यासह तो नियमित विक्री करायचा का, यासंदर्भातील तपास गुन्हे शाखा करीत आहे.
भोंदूबाबाची मर्जी राखण्यासाठी बिबट्याची शिकार; ५ संशयितांना अटक, इगतपुरीतील भयंकर प्रकार
-परिसरातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘एमडी’ची विक्री
-संशयित किरण सराईत गुन्हेगार; सामनगाव रस्त्यावर विक्रीची जबाबदारी
-राहुल सोनवणे (रा. फर्नांडिसवाडी), रोहित नेने (चेहेडी पंपिंग) हे साथीदार
-संशयित राहुल आणि रोहित पसार; त्यांनी किरणला एमडी पुरविले

मुंबई, गुजरातमधून एमडी

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सामनगाव येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये एमडी तयार होणारा कारखाना व गोदाम पोलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर वडाळा गावातील ‘बडी भाभी’च्या टोळीलाही अटक झाली. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, त्याचा भाऊ भूषण पानपाटील, सनी पगारे, अर्जुन पिवाल यांच्याशी संबंधित गँगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, त्यानंतरही नाशिक शहरातील एमडी विक्री, तस्करी व साठा थांबलेला नाही. मुंबई, गुजरातमार्गे एमडी नाशिकमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना आहे. त्यानुसार सध्या शहरात कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed