भाजप पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करुन नाशिक लोकसभेची जागा शिवसेना ऐवजी भाजपला मिळावी, अशी मागणी करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे महायुतीतील जागावाटपाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मात्र नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार याचे संकेत खुद्द भाजप नेत्यांनी देखील दिले आहेत. परंतु शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवत नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नाशिकच्या जागेवरुन महायुतीत ठिणगी पडल्याचं बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. श्रीकांत शिंदे यांनी भाजपला विश्वासात न घेता अशाप्रकारे उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र नाशिकच्या जागेबाबत काय निर्णय होणार? हे बघण महत्वाचं असणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भाजपकडूनदेखील नाशिक जागेसाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. या वाटाघाटी सुरु असताना श्रीकांत शिंदे यांनी थेट घोषणा केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या व्हिडीओमुळे स्थानिक पातळीवर महायुतीत कशी रस्सीखेच सुरु आहे ते पाहायला मिळत आहे. आता वरिष्ठ पातळीवर नाशिकच्या जागेवर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.