उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवतारे यांना भेटीसाठी बोलावलं. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढल्याचे वृत्त आहे. युतीचा धर्म म्हणून आपल्याला त्यांना (अजित पवार) मदत करावी लागेल. तुम्ही बंडखोरी करून चालणार नाही, अशा सूचना शिंदे यांनी शिवतारे यांना केल्या.
मुख्यमंत्री शिंदे-शिवतारे भेटीत नेमके काय घडले?
विजय शिवतारे यांनी सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. माझे बारामतीत लढणे कसे महत्त्वाचे आहे, तेथील गणिते कशी आहेत, हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच आपण मला थांबवू नका, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. अगदी पवार घराण्याला सर्वसामान्य माणूस कंटाळल्याचे सांगत आपल्याला पुरक वातावरण असल्याचे शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मात्र युतीची धर्म मोडून आपल्याला चालणार नाही. बापू माझे आपल्याला ऐकावे लागेल, आपल्याला माघार घ्यायला लागेल. ते त्यांच्या कर्माने मरतील. आपण त्यांच्या पराभवाचे धनी व्हायला नको, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
बारामतीची जागा युती हरणार
मी नसलो तरी अजित पवारांच्या पत्नी निवडून येत नाहीत. युतीची जागा जाणार आहे, अशी कल्पना मी मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही विजय शिवतारे यांनी सांगितलं. त्याचवेळी कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार यांना आता घाबरायला काय झालंय? माझी लायकी काय आणि आवाका किती हे अजित पवार यांना दाखवतो, अशी उघड भूमिका त्यांनी घेतली आहे.