• Sat. Sep 21st, 2024
उदयनराजेंना साताऱ्याचे तिकिट फायनल, गिरीश महाजन थेट सुरुची पॅलेसमध्ये

सातारा: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना आले उधाण आले. दोन्ही राजेंच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या झालेल्या बंद चर्चेत नेमकी कोणती चर्चा झाली. या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. महाजन यांनी उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसनजीकच असणाऱ्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची पॅलेसलादेखील भेट दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या दिवसापासून देशात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दुसरीकडे, साताऱ्यात महायुतीत कोणत्या पक्षाकडे उमेदवारी जाणार याची उत्सुकता अद्यापही नागरिकांना आहे. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, उदयनराजेंचं नाव दोन्ही यादीत जाहीर झालं नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन उदयनराजेंच्या भेटीसाठी आले होते.

उदयनराजेंना तर तिकीट मागण्याची गरजच नाही – गिरीश महाजन

उदयनराजेंसोबतच्या भेटीनंतर गिरीश महाजन पत्रकारांना बोलताना सांगितले, की तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या आहेत. उदयनराजेंना तर तिकीट मागण्याची गरजच नाही, त्यांचं तिकीट निश्चित आहे आणि त्यांचं तिकीट नाकारण्याचा विषयच येत नाही. त्याबाबत काही कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे उदयनराजेंचं तिकीट निश्चित असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भाजपा निवडणुकीच्या काळात आमचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी उदयनराजे यांचा राज्यभर कसा उपयोग होईल, याबाबत चर्चा करण्यासाठी मी सातारा येथे आलो होतो, असे महाजन यांनी सांगितले.

महाजन म्हणाले, लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराजांचा नावलौकिक आहे. त्यांच्या नावाचा एक वलय आहे आणि म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त मतदानासाठी, प्रचारासाठी कसं उपयोग करता येईल यावर चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये फार वेळ राहिला नाही. त्या काळामध्ये महाराज कुठे-कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्त फायदा कसा होईल हे पाहणार आहे.

महाराजांनी तिकीट मागायची गरज नाही. तिथे आमची गरज आहे. त्यामुळे राज्यात तीन पक्ष असल्यामुळे वाटाघाटी सुरू आहेत. महाराजांचे तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल मला सांगायची गरज नाही. तीन मित्रांची सोबत असल्यामुळे त्याची चर्चा करावी लागते, तशा वाटाघाटी चालल्या आहेत. सातारा लोकसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

गिरीश महाजन यांनी जरी उदयनराजेंचं तिकीट निश्चित म्हटलं असले तरी याबाबतचा निर्णय आता दिल्लीतून होणार आहे. त्यामुळे कदाचित तिसऱ्या यादीत उदयनराजे यांचे नाव येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात बंद कमरा चर्चा झाली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी साताऱ्यात आलो असून आज दोन्ही राजेंची भेट घेऊन सातारा लोकसभेचा आढावा घेतला असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी साताराच नव्हे तर इतर लोकसभा मतदारसंघात सध्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे. याविषयी देखील जाणून घेतले असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed