काय आहे प्रकरण?
लग्नसोहळा हा दोन्ही कुटुंबांसाठी आनंदसोहळा असतो; परंतु संसार सुरू झाल्यानंतर काही महिन्यांत किंवा वर्षांत जोडप्यांमध्ये अनेक कारणांवरून वाद होऊ लागतात. त्याची परिणिती ‘नकोच हे नाते’ या मानसिकतेपर्यंत येते. मात्र, लग्न झाल्यावर अवघ्या तीनच दिवसांत जोडप्याने वैचारिक मतभेदांच्या कारणास्तव एकमेकांपासून वेगळे राहण्याचा मार्ग स्वीकारल्याचे निदर्शनास येत आहे.
राजीव आणि रसिका (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे २५ मार्च २०२२ रोजी ‘अॅरेंज मॅरेज’ झाले. राजीव २७ वर्षांचा असून, नोकरी करतो, तर २५ वर्षांची स्मिता गृहिणी आहे. लग्नानंतर अवघे तीन दिवस दोघे एकत्र राहिले; परंतु या तीनच दिवसांत त्यांचे खटके उडाले अन् दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. वर्षभरानंतर त्यांनी हे नातेही संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज केला. नियमानुसार या दोघांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय काम ठेवला. अंतिम सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनीही दोघांची समजूत घालून त्यांचे नाते वाचविण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर अवघ्या तीनच दिवसांत विभक्त होण्याचा निर्णय घेत असल्याबाबत विचारणाही केली; परंतु एकमेकांशी पटत नसल्याच्या मुद्द्यावर दोघेही ठाम होते. अखेर न्यायालयाने या दाम्पत्याच्या घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
‘लग्नानंतर अवघ्या महिनाभराच्या आत विभक्त होण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले आहे. मनाविरुद्ध गोष्टी होत असल्याचे वाटल्यास लगेच वेगळे होण्याचा निर्णय घेतला जातो. जमले तर टिकवा; अन्यथा मिटवा अशी धारणा होत आहे. त्यामुळे तरुण जोडप्यांकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे’, असे विवाह समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.