• Mon. Nov 25th, 2024
    लेकीचा साखरपुडा झाला, दुसऱ्याच दिवशी आईचा करुण अंत, जिथे मांडव टाकला, तिथूनच अंत्ययात्रा

    धनाजी चव्हाण, परभणी : आईने आपल्या मुलीच्या लग्नासाठी दारामध्ये मांडव टाकला. मुलीचा साखरपुडा देखील धुमधडाक्यामध्ये झाला. साखरपुडा झाल्यानंतर आई रात्री फार खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आईला पॅरालिसिसचा झटका आला. दवाखान्यात जाईपर्यंत आईचा मृत्यू झाला. दोनच मुली असल्यामुळे मुलींनीच आईला अग्नी द्यावा, अशी संपूर्ण धोबी समाजाने निर्णय घेतला. मुलीच्या लग्नासाठी टाकलेल्या मांडवातूनच आईची अंत्ययात्रा निघाली.ही घटना घडली आहे परभणी शहरातील धार रोड परिसरामध्ये. मयत आईचे नाव सोनाबाई रामसिंग चौधरी असून त्या धोबी समाजाच्या आहेत. २५ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न रामसिंग चौधरी यांच्यासोबत झाले. लग्नानंतर त्यांना दोन्ही मुलीच झाल्या. दोन्ही मुली का झाल्या म्हणून रामसिंग यांनी पत्नीला आणि दोन्ही मुलींना सोडून निघून गेले. ते अद्यापपर्यंत आले नाहीत.
    कात्रज मनसेचाच बालेकिल्ला, वसंत मोरेंच्या सोडचिठ्ठीनंतर नेत्यांनी डिवचलं, भरचौकात बॅनरबाजी

    सोनाबाई चौधरी यांनी मात्र धीर सोडला नाही आपल्या पोटी दोन मुली असल्याने त्यांचे पालन पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. शहरातील एका कोपऱ्यावर त्यांनी इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना मोठे केले. मुली देखील आईला मदत म्हणून छोटी मोठी कामे करत असत. मोठी मुलगी लग्नाच्या योग्य झाल्यानंतर तिच्यासाठी मुलगा शोधण्याचे काम सुरू झाले. सोनाबाईंना समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींनी ह साथ दिली. धोबी समाज संघटने कडून सोनाबाईच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी ही उचलण्यात आली.

    त्यानंतर सोनाबाई यांची मुलगी हेमा हिचा विवाह रणवीर सिंग (रा. निजामाबाद तेलंगणा) यांच्याशी ठरला. १३ मार्च रोजी यांचा साखरपुडा झाला. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने साखरपुडा देखील थाटामाटात संपन्न झाला. १७ मार्च रोजी विवाह सोहळा संपन्न होणार त्यानिमित्ताने घराच्या अंगणामध्ये मोठा मंडपही टाकण्यात आला होता. सोनाबाई दिवसभर आनंदी होत्या. आपल्या मुलीचा विवाह पार पाडत आहे, याचं प्रचंड कौतुक त्यांना वाटत होतं. साखरपुडा संपल्यानंतर संध्याकाळी त्या झोपी गेल्या. सकाळी उठल्यानंतर त्यांची तब्येत एकदम बिघडली.

    सोनाबाई यांना यापूर्वीही दोनदा पॅरालिसिसचा झटका आला होता. १४ मार्च रोजी देखील त्यांना पुन्हा एकदा तिसरा पॅरालिसिसचा झटका आला. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मुलींनी आणि समाजातील काही युवकांनी त्यांना दवाखान्यात नेले. पण त्यांची तब्येत काही सुधरू शकली नाही. १४ मार्च रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. दोन्ही मुलींच्या डोक्यावर असलेले एकमेव मायेचे छत्र देखील हरवले. दोघींवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील धोबी समाज बांधवांनी बैठक घेतली. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे आपल्या आई किंवा वडिलांना मृत्यू पक्षात मुलगा अग्नी देत असतो. पण सोनाबाईंना दोन्ही मुलीच होत्या. त्यामुळे समाजाने निर्णय घेतला आणि सोनाबाईंच्या लहान मुलीने आपल्या आईला अग्नी दिला. अंत्यसंस्काराचा खर्च देखील समाज बांधवांनी उचलला.

    ज्या मुलीच्या लग्नासाठी दारात आईने मांडव टाकला त्याच मांडवातून आईची अंत्ययात्रा निघाली. आईचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या दोन्ही मुलींना समाजाने मात्र भक्कम साथ दिली. आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च तर त्यांनी केलाच केला, पण मुलीचे लग्न देखील लावून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्या १७ मार्च रोजी हेमा हिचा विवाह सोहळा निजामाबाद येथे संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याचा खर्च देखील जिल्ह्यातील धोबी समाज बांधवांनी उचलला आहे.

    धोबी समाज हा अन्य समाजाच्या तुलनेने फारच छोटा समाज आहे. या समाजातील सर्व धार्मिक विधी हे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे होतात. आई-वडिलांचे अंत्यसंस्कार देखील मुलांच्या हातून होतात. पण सोनाबाई यांना मुलगा नसल्याने समाजाने मुलीच्या हातानेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सोनाबाईंची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीच असल्याने मुलीच्या लग्नाचा खर्च आणि त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च देखील समाजानेच केला. समाज सक्षमपणे या परिवाराच्या पाठीशी उभा असल्याचे लखन परदेशी अध्यक्ष परभणी जिल्हा धोबी समाज यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *