• Sat. Nov 16th, 2024

    महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत – महसूल मंत्री विखे पाटील

    ByMH LIVE NEWS

    Mar 11, 2024
    महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत – महसूल मंत्री विखे पाटील

    मुंबई दि. ११ :- राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर सचिव राजेशकुमार, सहसचिव संजय बनकर, सहसचिव श्रीराम यादव, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे समन्वयक राजू धांडे उपस्थित होते.

    महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेत विभागीय आयुक्त आणि अधिकार्यांना सूचना देत मागण्यांवर सखोल चर्चा करून मार्गी लागण्याचे निर्देश दिले. महसूल विभागातील विविध पदनामे ही ब्रिटिश कालीन असल्याने सामाजिक प्रतिमा कमी होत चालली आहे. यामुळे आता अशा पदनामांचा दर्जा वाढविण्यासाठी विभागाने प्रयत्न करणे आवश्यक असून उचित पदनामे सुचविण्याचे निर्देश महसूल मंत्री यांनी दिले.

    याप्रसंगी प्रामुख्याने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध कर्मचारी कपात न करता लागू करणे, नायब तहसीलदार सरळ भरतीचे प्रमाण निश्चित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयक आणि वेतन वेळेत मिळणे, महसूल सहाय्यक व तलाठी यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करणे. अव्वल कारकून आणि तलाठी पदासाठी समान परीक्षा पद्धती लागू करणे, पदोन्नती संदर्भातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच महसूल विभागातील अव्वल कारकून यांचे पदनाम महसूल अधिकारी करणे अशा विविध मागण्या बाबत यावेळी चर्चा  करण्यात आली. राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून या पदनामांचा हिनतादर्शक शब्दप्रयोग होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे ही नावे बदलण्याची मागणी महसूल कर्मचारी संघटनांनी केली होती. या मागणीला राज्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

    ००००

    किरण वाघ/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed