मुंबई, दि. 11 : राज्यात आगामी खरीप हंगामाच्या कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने युरिया व डीएपीचा संरक्षित साठा करण्यात यावा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या
सन 2024 च्या खरीप हंगामामध्ये युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा करण्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अरुण दलाल, महाराष्ट्र कृषी व उद्योग विकास महामंडळाचे महेंद्र बोरसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, खरीप हंगामातील जून व जुलै महिन्यात युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य तुटवडा भासू नये म्हणून संरक्षित साठा करावा.
एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीतील दीड लाख टन व 0.25 लाख मीटर डीएपी खताचा संरक्षित साठा राज्यामध्ये करण्यासाठी नोडल एजन्सींना खत साठवणूक, वाहतूक विमा खताची चढाई उतराई, जीएसटी सेवा शुल्क इत्यादी अनुषंगिक खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. संरक्षित साठा करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशाही सूचना कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/