मुंबई, दि. ११ : गेल्या काही वर्षांत वातावरणात बदल झाले आहेत. त्याचे विपरित परिणाम म्हणून ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस, गारपीट, अशी संकटे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी मोबाईल जनजागृती व्हॅन अर्थात प्राणवायू रथाच्या माध्यमातून शेतकरी, नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिक्स फाऊंडेशन, लातूर यांच्या सहयोगाने बांबू लागवड, उत्पादन व संवर्धन मोबाईल जनजागृती व्हॅन अर्थात प्राणवायू रथाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, सहसंचालक डॉ. व्ही. एम. मोटघरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, बांबूची शेती पर्यावरण संवर्धनासाठी महत्वपूर्ण आहे. बांबूपासून विविध उत्पादने मिळतात. बांबूपासून अधिकचा ऑक्सिजन मिळतो. तसेच त्याचे कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. बांबू लागवडीचे प्रमाण वाढून पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेतकरी, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी प्राणवायू मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरेल. महामार्गांच्या दोन्ही बाजूला बांबूची लागवड करण्यात यावी, अशाही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
मुंबई शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच मुंबई शहरात रेसकोर्स परिसरात ३०० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई पार्क उभारण्यात येईल. तसेच विकास प्रकल्पांची उभारणी करताना ते पर्यावरण पूरक राहतील याचीही दक्षता घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी प्राणवायू रथाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच बांबूच्या आर्थिक, पर्यावरणीय मूल्याबद्दल जागरूकता वाढविणे आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देणे आहे. हा प्रकल्प लहान व अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीला चालना देत स्थिर, सातत्यपूर्ण आणि शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत प्रदान करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
०००००
गोपाळ साळुंखे/स.सं/