• Sat. Sep 21st, 2024
जयंतरावांच्या तालमीतला पैलवान ठाकरेंच्या आखाड्यात, सांगलीतून शड्डू ठोकणार?

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मंगळवारी दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी मुंबईकडे जात असताना त्यांचे पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या ताथवडे येथील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेला सुटली तर लोकसभेचा उमेदवार मीच असल्याचा मनोदय पाटील यांनी बोलून दाखवला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात सध्या चंद्रहार पाटील आहेत. मात्र ते आता उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या अगोदर पाटील यांनी जिल्हा परिषदेची एकमेव निवडणूक लढली आणि जिंकली होती. त्यानंतर ते दोनदा महारष्ट्र केसरी झाले होते. मात्र जागा आरक्षित झाल्याने दरम्यानच्या काळात त्यांना संधी मिळाल्या नाहीत. मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांचे काम सुरू होते. मात्र गेल्या वर्षभरापासून ते लोकसभेची तयारी करत आहेत. त्यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मुंबईत पक्षप्रवेश करताना मातोश्री बंगल्यासमोर ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. पाचशेहून अधिक वाहने घेऊन मुंबई दिशेने ते रवाना झाले आहेत. मुंबईकडे कूच करत असताना पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जयंतरावांच्या नेतृत्वात काम सुरू होते पण…..

यावेळी मटा ऑनलाइनशी बोलताना चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. ती निवडणूक मी जिंकली होती. जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू होते. मात्र त्यानंतर कुस्ती क्षेत्रात नशीब आजमविण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आणि मी दोनदा महाराष्ट्र केसरी किताब मिळविला. त्यानंतर आरक्षण पडल्याने निवडणुकीत उभे राहता आले नाही. मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काम सुरू होते. मात्र आता मी लोकसभेची तयारी केली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.

लोकसभेसाठी चंद्रहार पाटील जिल्हाभर संपर्क अभियान

चंद्रहार पाटील यांनी कुस्ती मैदान, बैलगाडी शर्यती, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांतून जिल्हाभर संपर्क अभियान राबवले आहे. लोकसभेच्या आखाड्यात नाव चर्चेत येण्यासाठीच्या विविध योजना पुढे आणल्या. या अगोदर पाटील हे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांतील नेत्यांच्या संपर्कात होते. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदार संघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच चंद्रहार प्रवेश ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed