मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्यास उच्च न्यायालयानेही महापालिकेला सूचना केली होती. तसेच यामध्ये कृती आराखडा तयार करण्याची सूचना होती. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने स्टेनलेस स्टील, फायबर आणि डक्टाईल आर्यन जाळ्या बसवण्याचे नियोजन केले. तिन्ही प्रकारातील १०० सुरक्षित जाळ्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर भागांतील मलनिस्सारणच्या अखत्यारीतील मॅनहोलवर बसवण्यात आल्या. नवीन प्रकारातील १०० जाळ्यांचा आढावा घेतल्यानंतरच ऊर्वरित मॅनहोलवर मजबूत अशा जाळ्या बसवण्यात येणार होते. ही चाचणी यशस्वी झाल्याने मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या सर्व मॅनहोलवर मजबूत अशा संरक्षित झाकण व जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्टेनलेस स्टील, फायबर आणि डक्टाईल आर्यनमध्ये बहुतांश जाळ्या या डक्टाईल प्रकारातील असणार आहेत. डक्टाईलच्या जाळ्यांचा एकूण खर्च आणि देखभालीचाही खर्च कमी असल्याने जास्तीत जास्त या जाळ्या बसवण्यावर पालिकेचा भर आहे. त्यासाठी पालिकेने प्रभागस्तरावर निविदा काढण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार २४ पैकी काही प्रभागांकडून निविदा काढण्यात आल्या आहे. मात्र काही प्रभागांकडून या कामांसाठी विलंब झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याआधी मुंबईतील सर्व मॅनहोलवर संरक्षित जाळ्या बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे.
ज्या वॉर्डात संरक्षक जाळ्या मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचा धोका आहे किंवा सरंक्षक जाळ्यांची दुरवस्था आहे किंवा अद्याप बसवलेल्या नाहीत अशा ठिकाणी प्राधान्याने पावसाळ्याआधी मॅनहोलवर नवीन संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नवीन संरक्षक झाकणांसह जाळ्या बसवण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सायरन वाजणारी यंत्रणा तूर्तास बाजूला?
-मुंबईतील मॅनहोलचे झाकण चोरांकडून उघडताच किंवा मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यास त्याचा अलर्ट देणारा सायरन वाजणारी यंत्रणा मुंबईतील १४ ठिकाणी असलेल्या मॅनहोलवर बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या नवीन यंत्रणाची सध्या चाचणी सुरू असून काही तांत्रिक समस्या अद्यापही येत आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न पालिकेकडून होत आहे. मात्र त्यात पालिका आणि चाचणी करणाऱ्या कंपनीलाही यश मिळालेले नाही.
-दहा ठिकाणी झाकण चोरीचा प्रयत्न करताच सायरन वाजणारी, तर झाकण चोरीला जाणे आणि मॅनहोलमधील पाणी ओव्हरफ्लो होताच सायरन वाजणारी एकत्रित यंत्रणा चार ठिकाणी बसवली आहे. मजबूत अशा नवीन संरक्षक झाकणांसह जाळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यास सायरन यंत्रणा तूर्तास बाजूला ठेवण्याचा विचार करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.